

मुंबई (Mumbai): मुंबईलगतच्या निसर्गसंपन्न डोंगरी परिसरावर गेली काही महिने टांगती तलवार लटकत होती. दहिसर ते भाईंदर या मेट्रो नऊ मार्गिकेसाठी डोंगरी येथे प्रस्तावित असलेल्या कारशेडमुळे तिथल्या समृद्ध पर्यावरणाचा बळी जाणार होता. तब्बल बारा हजारांहून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड चालवून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा सुरू असलेला लढा अखेर यशस्वी ठरला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जनभावनेचा आदर करत डोंगरी येथील कारशेड रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
एमएमआरडीएकडून १३.५ किमी लांबीच्या 'दहिसर – भाईंदर मेट्रो ९' मार्गिकेचे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. यापैकी दहिसर – काशीगाव टप्पा डिसेंबरअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र या मार्गिकेतील कारशेडचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. या मार्गिकेतील कारशेड राई, मुर्धा, मोर्वा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र तेथील शेतकरी आणि स्थानिकांनी यास विरोध केल्याने कारशेड डोंगरीला हलविण्यात आली.
डोंगरीत कारशेड बांधण्यास सरकारची मंजुरी दिली. त्यानंतर एमएमआरडीएने पुढील कार्यवाही पूर्ण करून डोंगरीतील ५७ हेक्टर जागा ताब्यात घेतली आणि कारशेडच्या बांधकामाच्यादृष्टीने तयारी सुरू केली. या कामासाठी येथील १२ हजारांहून अधिक झाडे कापावी लागणार होती.
झाडे कापण्यासाठी परवानगीही घेण्यात आली होती. मात्र कारशेड डोंगरीत हलविण्याचा निर्णय घेतल्यापासून उत्तन, डोंगरीसह आसपासच्या गावांतील रहिवाशांची, पर्यावरणप्रेमींनी या कारशेडला विरोध करण्यास सुरुवात केली होती.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या डोंगरीला सिमेंटच्या जंगलात रूपांतरित करण्याचा हा घाट स्थानिकांच्या जिवावर उठला होता. या लढ्यात केवळ विरोधासाठी विरोध नव्हता, तर त्यामागे तर्कशुद्ध कारणेही होती. सुभाषचंद्र बोस मेट्रो स्थानकाजवळ मुबलक मोकळी जागा उपलब्ध असतानाही, केवळ काही विशिष्ट विकासकांच्या हितासाठी कारशेड डोंगरीत नेण्याचा अट्टहास का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला होता.
अखेर या जनरेट्यापुढे प्रशासनाला झुकावे लागले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला पूर्णविराम देण्यात आला. सोमवारी झालेल्या या निर्णायक बैठकीत डोंगरी कारशेड रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, लवकरच यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध होईल. विकासाची गंगा वाहताना ती निसर्गाचा बळी घेऊन वाहू नये, याचे भान या निर्णयाने अधोरेखित केले आहे. दहिसर-काशीगाव टप्पा पूर्णत्वाकडे जात असताना, कारशेडचा प्रश्न अद्याप अनिर्णित असला तरी, 'डोंगरी वाचली' याचे समाधान स्थानिकांमध्ये आहे.