Mumbai: उत्तर मुंबईच्या विकासासाठी केंद्र - राज्याची 'डबल इंजिन' रणनीती

Mantralaya
MantralayaTendernama
Published on

मुंबई (Mumbai): आगामी काळातील पायाभूत सुविधांचे नियोजन आणि मुंबईच्या बदलत्या रुपाचा विचार करता, राज्य आणि केंद्र सरकारने आता उत्तर मुंबईवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार गोराई भागात दिल्लीतील प्रसिद्ध 'भारत मंडपम'च्या धर्तीवर एक अद्ययावत 'कन्व्हेंशन सेंटर' उभारण्यात येणार आहे. यामुळे उत्तर मुंबई केवळ निवासी भाग न राहता जागतिक व्यावसायिक केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळेलच, पण आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी मुंबईला एक नवीन पर्याय उपलब्ध होईल.

Mantralaya
Devendra Fadnavis: शहरे सुरक्षित ठेवण्यासाठी CCTV यंत्रणेचे जाळे मजबूत करा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. बैठकीस केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध जागांवर विकासाची कामे सुरू आहेत. तसेच भविष्यातही विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधत अशा जागांचा संयुक्त सर्वे करण्यात यावा. विकास कामांकरिता लागणाऱ्या जमिनींबाबत केंद्र शासनाशी संबंधित बाबींकरिता संपूर्ण जागांचा एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या जागांच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार पाठपुरावा करून प्रकरणे तातडीने निकाली निघण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा.

Mantralaya
Chakan Traffic: चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता सुटणार; कारण...

मुंबई महानगर प्रदेशात विविध पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे मुंबईचे दळणवळण अधिक गतिमान होणार आहे. या विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांकरिता घरांची व्यवस्था करण्यात येते. अशा 'हाऊसिंग स्टॉक'मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेंद्रा- बिडकीन उद्योग क्षेत्रात नवीन उद्योग क्षेत्रासाठी जमिनीची आवश्यकता आहे. नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सोबत येथील जमिनीच्या उपलब्धतेबाबत पाठपुरावा करावा. दिघी औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या कामांना गती द्यावी. मुंबई महापालिकेने शताब्दी आणि भगवती रुग्णालयामध्ये दर्जेदार रुग्णसेवेसाठी आधुनिक यंत्र सामुग्री, स्वच्छता आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी दिले.

मुंबईत सुरू असलेल्या गावठाणांचे रेखांकन गतीने पूर्ण करावे. रेखांकन पूर्ण झाल्यानंतर गावठाणामधील शेवटच्या नागरिकाला नागरी सुविधा मिळतील, याची खबरदारी घ्यावी. गोराई भागात दिल्ली येथील भारत मंडपम च्या धर्तीवर 'कन्व्हेंन्शन सेंटर' निर्माण करण्याकरिता कार्यवाही करावी. यासाठी बृहत नियोजन आराखडा बनवावा. या केंद्राचा उपयोग व्यावसायिक स्तरावर होईल, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

Mantralaya
Mumbai: रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल, बोगद्यांवर MMRDA खर्च करणार तब्बल 48 हजार कोटी

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहे. यामध्ये उत्तर मुंबईमधील शिंपोनी कौशल विकास केंद्र तयार असून ते कार्यान्वित करावे. कांदिवली भागामध्ये क्रीडाविषयक पायाभूत सुविधांची निर्मिती पीपीपी तत्त्वावर करण्यात यावी. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने निर्माण करण्यात येणाऱ्या क्रीडाविषयक पायाभूत सुविधांमध्ये स्थानिक क्रीडा विभागाच्या प्रशासनाने सक्रिय सहभाग घ्यावा. 

या भागातील मैदानांवर क्रीडाविषयक स्पर्धा आयोजित करण्यावर भर देण्यात यावा. केंद्र शासनाने देशाला ३१ मार्च २०२९ पर्यंत 'ड्रग फ्री इंडिया' करण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेत पोलीस प्रशासनाने आपले योगदान द्यावे.

मत्स्यसंपदा योजनेमध्ये किनारी गावांचा विकास करण्यात यावा. मासेमारीसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात यावी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सध्या राहत असलेल्या नागरिकांकरिता मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी. या सुविधेचा पर्यटकांसाठीसुद्धा लाभ होऊ शकतो, असेही केंद्रीय मंत्री पियुष गोयल यावेळी म्हणाले.

बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्य सचिव (गृह) मनिषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मिलिंद म्हैसकर, पोलिस आयुक्त देवेन भारती, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू, एमएमआरडीए अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल आदी उपस्थित होते. तसेच बैठकीत मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे सहभागी झाल्या होत्या.

Tendernama
www.tendernama.com