मुलुंडमधील डीपी रस्ता गेला ‘चोरीला’; जबाबदार कोण?

आमदार मिहिर कोटेचा यांची कारवाईची मागणी
BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai): मुलुंड पश्चिम येथील ऑफ पार्क रोड ते तानसा पाईपलाईनदरम्यान एलबीएस मार्गाला जोडणारा विकास आराखड्यातील (डीपी) रस्ता प्रत्यक्षात अस्तित्वात नसून, तो एका नामांकित विकासक असलेल्या ओबेरॉय रिॲल्टीने बेकायदेशीररीत्या प्रकल्पात समाविष्ट केल्याचा गौप्यस्फोट भाजपचे मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांनी केला आहे. या प्रकरणी सार्वजनिक मालमत्तेची चोरी झाल्याचा दावा करत त्यांनी मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संबंधित रस्ता शोधून तो बृहन्मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे.

BMC
BMC: टेंडर न काढता एकाच कंपनीला जवळपास ₹70 लाखांची 8 कामे? स्थायी समितीत सर्वपक्षीय हल्लाबोल

कोटेचा यांनी मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एलबीएस मार्गावरील ऑफ पार्क रोड ते तानसा पाईपलाईनदरम्यानचा डीपी रस्ता (भूखंड क्रमांक ५४३, ५४४ आणि ५४७, नाहूर गाव) विकास आराखड्यात मंजूर आहे. या रस्त्याचा काही भाग विकसित करण्यात आला असला, तरी उर्वरित भाग प्रत्यक्षात उपलब्ध नसून तो संबंधित विकासकाने आपल्या प्रकल्पात समाविष्ट केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महापालिकेच्या नियमानुसार डीपी रस्ता हा सार्वजनिक मालमत्ता असून तो महापालिकेच्या ताब्यात आणि नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र संबंधित रस्ता प्रत्यक्षात उपलब्ध नसल्याने संबंधित विकासकाविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच गायब झालेला डीपी रस्ता शोधून तो महापालिकेच्या ‘टी’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या ताब्यात देण्यात यावा, अशी मागणी कोटेचा यांनी केली आहे.

या तक्रारीसोबत त्यांनी विकास आराखड्याचा नकाशा आणि अन्य संबंधित कागदपत्रेही पोलिसांकडे सादर केली आहेत. यावेळी भाजपच्या नगरसेविका दीपिका घाग आणि नगरसेवक नील सोमय्या उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना कोटेचा म्हणाले, पहिल्यांदा निवडून आलेल्या आमच्या नगरसेविका दीपिका घाग यांनी त्यांच्या प्रभागात नवीन रस्ते विकसित करण्यासाठी सहकार्याची विनंती केली होती. त्यानंतर विकास आराखड्याचा अभ्यास केला असता तानसा पाईपलाईन परिसरातून ऑफ पार्क रोडमार्गे एलबीएस मार्गाला जोडणारा महत्त्वाचा जोडरस्ता प्रस्तावित असल्याचे आढळले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरला असता. मात्र, प्रत्यक्ष जागेची पाहणी केली असता प्रस्तावित रस्त्याची जागाच उपलब्ध नसल्याचे दिसून आल्याचे आमदार कोटेचा यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, चौकशीअंती संबंधित जागेवर ओबेरॉय रिॲल्टीचा मोठा प्रकल्प उभारण्यात आल्याचे आढळले. सुमारे ६० मजली इमारत, संरक्षक भिंत आणि बॅरिकेड्समुळे डीपी रस्ता प्रकल्पाचाच भाग झाल्याचे दिसून येते. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे या प्रकरणात ओबेरॉय रिॲल्टी आणि संबंधित वास्तुविशारद जबाबदार असल्याचे आमदार कोटेचा यांनी सांगितले.

कोटेचा यांनी असाही दावा केला की, एखाद्या प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाल्यानंतर संबंधित डीपी रस्ता महापालिकेच्या ‘टी’ विभागाच्या कार्यक्षेत्रात येतो. मात्र, तो प्रत्यक्षात अस्तित्वात आहे की नाही, त्यावर अतिक्रमण झाले आहे का किंवा तो बेकायदेशीररीत्या नाहीसा झाला आहे का, याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे त्यांनी ‘टी’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांनाही याबाबत लेखी निवेदन दिल्याचे सांगितले.

Tendernama
www.tendernama.com