
MMRDA
Tendernama
मुंबई (Mumbai) : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वांद्रे पूर्वेकडील कलानगर येथील जुन्या उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्याच्या हालचाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरु केली आहे. उड्डाणपुलाचे लोखंडी स्ट्रिप जॉइंट्समध्ये अडचण असल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे, सूत्रांनी सांगितले. हे काम मार्गी लागल्यास या मार्गावरील प्रवास आणखी वेगवान होणार आहे.
कला नगर येथे वाहतुकीची होणारी कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने वांद्रे कुर्ला संकुल ते वरळी सी-लिंक आणि वरळी सी-लिंक ते वांद्रे कुर्ला संकुल अशा दोन मार्गिका सुरु केल्या आहेत. यामुळे येथील वाहतूक कोंडी दूर झाली आहे. तसेच येथे सायन धारावीला जोडणाऱ्या मार्गिकेचे काम सुरु आहे. कला नगर येथील वाहतूक कोंडी दूर झाली असली तरी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जुन्या उड्डाणपुलाच्या स्ट्रिप जॉइंट्सवर काही समस्या आहेत. यामुळे वाहन चालकांना त्रास होत असल्याने तसेच या मार्गावर काही ठिकाणी खड्डे पडल्याच्या तक्रारी वाहन चालकांकडून प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत काही कामे एमएमआरडीएने मार्गी लावली असून स्ट्रिप जॉइंट्सचे काम लवकरच सुरु करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
जुना कलानगर उड्डाणपूल 1990 च्या मध्यात बांधण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने 2017 मध्ये हा मार्ग एमएमआरडीएकडे हस्तांतरित केला आहे. त्यानुसार या मार्गाची देखभाल एमएमआरडीएकडून सुरु आहे. या मार्गावरील वाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी एमएमआरडीएने या महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे ठरवले आहे.