
मुंबई (Mumbai): मागाठाणे ते गोरेगाव रस्ता ३६.७ मीटर रुंदीचा आहे. हा रस्ता पश्चिम द्रुतगती मार्गास समांतर असून १९९१ च्या विकास नियोजनातील आहे. या रस्त्याचा विषय मुख्यमंत्री वॉर रूममध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. सर्व अडचणींवर मात करीत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
या रस्त्याच्या कामाबाबत सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. नगरविकास राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, हा रस्ता मुख्यमंत्री वॉर रूममध्ये असल्यामुळे याबाबत बैठक घेण्यात येईल. हा रस्ता ५.२ किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्यापैकी २.६० किलोमीटर रस्ता विकसित झालेला आहे.
या रस्त्यावरील २५० मीटर लांबी अतिक्रमित भूभाग असून एकूण ३१० बांधकामे बाधित होत आहेत. त्यानुसार सद्यस्थितीत बाधितांचे अंतिम परिशिष्ट दोन पारित करण्यात आले आहे. या बाधितांना एकूण ४७ सदनिका देण्याकरिता सोडत करण्यात आली आहे. उर्वरित सदनिका हस्तांतरण करण्याची कार्यवाही करण्यात येईल.