
मुंबई (Mumbai) : सर्वसामान्यांचे गृहस्वप्न पूर्ण करणारे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा- MHADA) येत्या आर्थिक वर्षात तब्बल १९ हजार ४९७ घरे बांधणार आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत पाच हजार १९९ घरे असतील.
त्यासाठी ‘म्हाडा’ने तब्बल नऊ हजार २०२ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘म्हाडा’ने १५ हजार ९५१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे.
पुढील वर्षभरात सामान्यांना ‘म्हाडा’ची मुबलक घरे उपलब्ध होणार आहेत. प्राधिकरणाने २०२५-२०२६च्या १५,९५१.२३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला आणि २०२४-२५च्या १०,९०१.०७ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे.
अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार मुंबई मंडळाअंतर्गत पाच हजार १९९ सदनिकांची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी पाच हजार ७४९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याशिवाय ‘म्हाडा’च्या इतर मंडळांतील घरांच्या बांधकामांसाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे.
‘म्हाडा’ची मुंबई वगळता कोकण, पुणे मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात घरे पडून आहेत. तरीही ‘म्हाडा’ त्या ठिकाणी मोठ्या संख्येने घरे का बांधणार आहे, असा प्रश्न सामान्यांकडून व्यक्त केला जात आहे.
अशी आहे तरतूद
मंडळ....घरे....रक्कम (कोटी रुपयांत)
- कोकण मंडळ - ९,९०२ - १,४०८
- पुणे मंडळ - १,८३६ - ५८५.९७
- नागपूर मंडळ - ६९२ - १,००९
- छत्रपती संभाजीनगर मंडळ - १,६०८ - २३१
- नाशिक मंडळ - ९१ - ८६
- अमरावती मंडळ - १६९ - ६५.९६