

मुंबई (Mumbai) : राज्यातील कारागृहांवरील वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने पालघर, अहिल्यानगर, बारामतीसह 9 ठिकाणी नवीन कारागृहे उभारण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे एकूण 16,287 बंदी क्षमतेत वाढ होणार आहे.
राज्यातील कारागृहांमध्ये वाढत्या बंदी संख्येमुळे निर्माण झालेल्या ताणावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने पायाभूत सुविधा विस्ताराचा मोठा निर्णय घेतला आहे. पालघर, अहिल्यानगर, बारामती, येरवडा (पुणे), गोंदिया, हिंगोली, भुसावळ आणि अंबाजोगाई या ठिकाणी नवीन मध्यवर्ती व जिल्हा कारागृहे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या प्रकल्पांमुळे राज्यातील कारागृहांच्या अधिकृत क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, केवळ नवीन कारागृहांमुळेच सुमारे 12,258 बंदी क्षमतेची भर पडणार आहे. यापैकी पालघर, नारायणडोह (अहिल्यानगर) आणि बारामती येथे अनुक्रमे 18, 35 आणि 60 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित प्रकल्प विविध टप्प्यांवर प्रगतीपथावर आहेत.
यासोबतच विद्यमान कारागृहांमध्ये अतिरिक्त बॅरेक्स उभारण्यावरही भर देण्यात आला आहे. येरवडा मध्यवर्ती, नागपूर मध्यवर्ती, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा जिल्हा कारागृहात एकूण 35 बॅरेक्सचे काम सुरू आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर 1,035 बंदी क्षमतेत वाढ होणार आहे.
2025-26 या आर्थिक वर्षात संभाजीनगर, अकोला, कोल्हापूर, विसापूर, लातूर, जालना आणि धुळे येथील कारागृहांमध्ये अतिरिक्त बॅरेक्स उभारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामांमुळे आणखी 1,138 क्षमतेची वाढ अपेक्षित आहे.
एकूणच, नवीन कारागृहे आणि अतिरिक्त बॅरेक्स यांच्या माध्यमातून राज्यात 16,287 नव्या बंदी क्षमतेची निर्मिती होणार आहे. कारागृह विभागाने भविष्यातील गरज लक्षात घेऊन आणखी 14 ठिकाणी नवीन जागांची मागणी केली आहे.
दरम्यान, मुंबईतील मध्यवर्ती कारागृहाच्या पुनर्विकासाचाही प्रस्ताव पुढे सरकत आहे. या संदर्भातील आराखडे तयार करण्याचे काम सुरू असून संबंधित जागा हस्तांतरण प्रक्रियाही प्रगतीत आहे.
राज्यातील कारागृहांमध्ये वाढणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी ही पायाभूत सुविधा उभारणी महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकल्पांमुळे कारागृह व्यवस्थेवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
कामे प्रगतीपथावर
राज्यात 9 नवीन कारागृहे प्रस्तावित
एकूण 16,287 बंदी क्षमतेत वाढ
पालघर, बारामतीसह काही कामे प्रगतीपथावर
35 अतिरिक्त बॅरेक्सचे बांधकाम सुरू
आणखी 14 ठिकाणी नवीन जागेची मागणी