एसटीचा दररोज ४ कोटींच्या तोट्यात प्रवास; आता घेतला मोठा निर्णय

ST
STTendernama

मुंबई (Mumbai) : कोविड आणि त्यानंतर संप यामुळे महाराष्ट्रातील सगळ्यांची लाडकी एसटी अद्यापही सुरळीत होऊ शकलेली नाही. कोविडपूर्वी महामंडळाचे दररोजचे उत्पन्न २१ ते २२ कोटी रुपये होते. सध्या हा आकडा १८ कोटींवर स्थिर आहे. त्यामुळे दरदिवशी एसटी ४ कोटींच्या तोट्यात प्रवास करीत आहे. या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळाने ताफ्यातील १ हजार जुन्या एसटी सीएनजीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर १४० कोटी रुपये खर्च होणार आहे.

ST
ठाकरे सरकार जाणार अन् मोदींची बुलेट ट्रेन सुसाट सुटणार?

एसटी महामंडळाच्या ताफ्यात १६ हजार बस आहेत. यात फक्त ५० बस सीएनजीच्या असून त्या ठाणे विभागात आहेत. तर पुणे ते अहमदनगर मार्गावर दोन बस या विजेवर धावणाऱ्या आहेत. आणखी १४८ विजेवरील बस लवकरच ताफ्यात येतील. महामंडळाकडे डिझेलवर धावणाऱ्या बस पाहता यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. एसटी महामंडळाच्या एकूण खर्चापैकी डिझेलवर होणारा खर्च हा पूर्वी ३४ टक्के होता, सध्याच्या काळात हा खर्च ३८ ते ४० टक्क्यांपर्यंत गेला आहे. त्यातच कर्मचाऱ्यांबरोबर वेतन करार, सरकारकडचे थकीत अनुदान या सर्वामुळे एसटीचा तोटा गेल्या काही वर्षांत वाढतच गेला. त्यामुळे इंधन बचत आणि तोट्यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळाने ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या बस दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यातही नवीन बस न घेता सध्या धावत असलेल्या बसपैकी एक हजार बस या सीएनजीसाठी रुपांतरित केल्या जाणार आहेत. यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ती पूर्ण झाली असून एका कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. येत्या एका वर्षांत या बस परिवर्तित होतील, असेही ते म्हणाले. यासाठी १४० कोटी रुपये खर्च येणार आहे. या निर्णयामुळे येत्या काळात डिझेलवरील खर्चाची बचत होईल. सीएनजी स्टेशन्स हे राज्यात सर्व ठिकाणी उपलब्ध नसल्याने मुंबई, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातच सुरुवातीच्या काळात सीएनजी बस चालवण्याचे नियोजन आहे.

ST
पुणे-मुंबई प्रवास आता होणार अधिक आरामदायक! एसटीचा मोठा निर्णय...

डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाने आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी महामंडळाने आपल्या ताफ्यातील बहुतांश बसेस 'एलएनजी'वर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महामंडळाला वर्षांकाठी एक हजार कोटींचा फायदा होणार होता. परंतु गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पावर नुसतीच चर्चा झाली. या कामासाठी एका कंपनीची नियुक्तीही केली. परंतु त्यासाठी लागणारा खर्च व अन्य मुद्दय़ांवर या कंपनीशी चर्चाच सुरु आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही. त्याआधी सीएनजीत रुपांतरित करण्याच्या कामाला सुरुवात होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com