
मुंबई (Mumbai) : ठाणे मनोरुग्णालयाची झोपडपट्टीने व्यापलेली जागा झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाला (एसआरए) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे प्रतिज्ञापत्र ठाणे मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे. मनोरुग्णालयाच्या जागेवर धर्मवीर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि सप्तशृंगी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अशा दोन सोसायटी असून त्या सोसायटींच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून ही जागा खासगी विकसकाला दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालात या जागेवर असलेल्या झोपड्या हटवून ती जागा आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यात यावी, असे म्हटले आहे. याच निकालाचा आधार घेत तत्कालीन मुंबई मंडळाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांनी या अनधिकृत झोपड्या असलेली जागा मनोरुग्णालयाच्या नव्या इमारतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले आहे, मात्र आता डॉ नेताजी मुळीक यांनी नव्याने जे प्रतिज्ञापत्र सादर केले, त्यात या अनधिकृत झोपड्या नवीन इमारतीच्या आसपास देखील येत नाहीत, असे म्हटले आहे.
2023-24 च्या अर्थसंकल्पात ठाणे मनोरुग्णालयासाठी आणि कोल्हापूरसाठी 800 कोटींची तरतूद केली आहे. मात्र जर एसआरएसाठी जागा दिली गेली, तर यातील ठाणे मनोरुग्णालय नेमके कुठे होणार आणि कधी होणार हा मोठा प्रश्न आहे. ठाणे मनोरुग्णालयाकडे एकूण 73 एकर जागा होती, मात्र त्यापैकी 14.30 एकर जागा आधीच नवीन ठाणे स्टेशनसाठी दिली गेली आहे. तर, 5 एकर जागा सामाजिक संस्थांना दिली आहे. काही जागा उद्याने बनवण्यासाठी दिली आहे, तर आता अनधिकृत झोपड्या असलेली जागा देखील एसआरएसाठी देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोसायटीच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून ठाण्यातील मनोरुग्णालयाची जागा खासगी विकसकाला देण्याची तयारी सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.