

मुंबई (Mumbai): मुंबईतील सर्व बांधकाम प्रकल्पांवर प्रभावी आणि पारदर्शक देखरेख राहावी यासाठी आयओटी (IoT) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मॉनिटरिंग प्रणाली विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व बांधकाम प्रकल्पांवर १०० टक्के नियंत्रण आणि निरीक्षण सुनिश्चित करण्यासाठी डायनॅमिक, रिअल-टाईम मॉनिटरिंग सिस्टीम उभारण्याबाबत बृहृन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य किरण सरनाईक यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य अभिजीत वंजारी, धीरज लिंगाडे यांनी उपप्रश्न उपस्थित केला. फडणवीस म्हणाले, सध्या काही प्रकल्पांमध्ये ‘आयओटी-एआय’प्रणालीचा अंशतः वापर सुरू असून, त्याचा विस्तार करून सर्व प्रकल्पांवर ही यंत्रणा लागू केली जाणार आहे. मुंबईतील वाढत्या पायाभूत सुविधा आणि इमारत प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर पारदर्शक, तांत्रिक आणि सतत देखरेख ठेवणे अत्यावश्यक आहे.
या नव्या व्यवस्थेमुळे सरकारी तसेच खासगी सर्व बांधकामांवर एकसमान नियंत्रण ठेवता येईल. या प्रणालीद्वारे बांधकामांची गुणवत्ता, सुरक्षेचे नियमांचे पालन यावर डिजिटल पद्धतीने लक्ष ठेवले जाईल. तसेच कोणत्याही अनियमितता किंवा नियमभंगाची माहिती तत्काळ उपलब्ध होऊन संबंधितांवर त्वरित कारवाई करणे शक्य होणार आहे.
याबाबत माहिती देताना पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रदूषण आणि बांधकामांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीच्या समस्येबाबत आकडेवारीची सत्यता अधिकृत यंत्रणेमार्फत पडताळून पाहणे आवश्यक आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर बांधकामांमधून डेब्रिज (मलबा) निर्माण होत असून, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुढील तीन ते सहा महिन्यांत ठोस कृती आराखडा तयार केला जाईल. मुंबईत अनेक ठिकाणी व्यापक मॉनिटरिंग प्रणाली कार्यरत असून त्याद्वारे हवेची गुणवत्ता तपासली जाते.
याशिवाय बृहृन्मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रत्येक मोठ्या बांधकाम प्रकल्पावर स्वतंत्र मॉनिटरिंग उपकरणे बसवून ती थेट डॅशबोर्डला जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणतीही इमारत बांधकाम किंवा विकासकामामुळे प्रदूषण होत असेल, तर तात्काळ कारवाई केली जाईल असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.