CM: ...तर रस्त्यावरील खड्ड्यांना अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार!

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) शहरात सुरू असलेली विकासकामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या. तसेच कामे पूर्ण करताना कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेणार नाही, असा इशारा देतानाच यात हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Eknath Shinde
नितीन गडकरींचा नागपुरातील 'हा' महत्त्वाचा प्रकल्प अडचणीत?

ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पोलीस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

हा रस्ता कुणाच्या मालकीचा आहे याचा विचार न करता त्यावरील खड्डे तत्काळ बुजवा. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात सध्या अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असून, त्याचा मोठा ताण ठाणे शहरावर पडला आहे, परिणामी जागोजागी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे बहुतांश कामे ही १ जूनपूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना आतापासूनच हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कामे पूर्ण करताना कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेणार नाही, असा इशारा देतानाच पावसाळ्यात रस्त्यावर पडणारा छोटा खड्डा देखील जीवघेणा ठरतो त्यामुळे आपल्या अखत्यारितील रस्त्यावर खड्डे राहणार नाहीत याची जबाबदारी त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांची असेल. यात हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकांना उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा देणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असून, ती आपण सर्वांनी पार पडायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Eknath Shinde
धक्कादायक! सरकारची आर्थिक स्थिती खालावली? 2200 कोटीचे धनादेश रोखले

भिवंडी-कशेळी मार्गावरील एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेले काम ६० टक्के पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. भिवंडी शहरातील जे रस्ते खराब आहेत त्यांची डागडुजी तात्काळ एमएमआरडीएच्या माध्यमातून करून घ्यावी. साकेत-खारेगाव पुलावर होणारी कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातून मुंबई-नाशिक महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याचे कामदेखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. गरज वाटल्यास रात्रंदिवस काम करून अतिरिक्त मनुष्यबळ वापरण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

ठाणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीदरम्यान अनेकदा काल्हेर ते आर. सी. पाटील दरम्यान मुंबई महानगर पालिकेच्या पाईपलाईन रोडचा वापर केला जातो. ह्या पाईपलाईन रोडची डागडुजी ताबडतोब करून तो सुस्थितीत आणण्याच्या सूचना यावेळी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मुंब्रा बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू असल्याने सध्या वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या कामाला गती देतानाच त्याच्या दुभाजकादरम्यान झाडे लावण्याचे तसेच त्यांच्या दोन्ही बाजू आधुनिक पद्धतीने बांबूच्या सहाय्याने सुशोभित करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

Eknath Shinde
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसची वेळ बदलणार; कारण...

ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारितील घोडबंदर मार्गावरील गायमुख-वाघबीळ मार्गावरील साईड पट्ट्यांचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले असून ते वेळेत पूर्ण करावे. तसेच घोडबंदर रोड आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील सर्व्हिस रोड आणि महमार्ग दोन्ही वापरात आणावे अशा सूचना त्यांनी दिल्या. सर्व्हिस रोडचा पार्किंगसाठी होणारा वापर थांबवून वाहनांवर कारवाई करावी तसेच बसेस, ट्रक आणि स्कूल बसच्या पार्किंगसाठी खारेगाव टोलनाका तसेच पूर्व द्रुतगती मार्गालगतचे जकात नाक्यांच्या मोकळ्या जागांचा वापर करावा, असे निर्देश दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आयोजित बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलिस आयुक्त जयजित सिंह, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, वाहतूक विभागाचे उपायुक्त विनय राठोड आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com