
मुंबई (Mumbai): महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या महामार्ग ५४८ (सी) अंतर्गत बीड जिल्ह्यातील माजलगाव ते केज व जालना जिल्ह्यातील परतुर ते माजलगाव पॅकेजच्या कामांची दुरुस्ती व उर्वरित कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावीत. तसेच माजलगाव शहरातील पाईपलाईनच्या पूर्ण झालेल्या कामांची चाचणी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात राष्ट्रीय महामार्ग ५४८ (सी) अंतर्गत माजलगाव ते केज (जि. बीड) व माजलगाव ते परतूर (जि. जालना) या कामाबाबत बैठक झाली.
यावेळी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्रीनिवास कातकडे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, रस्ते वाहतूक आणि महामार्गचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत फेगडे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता श्रीवगे, राष्ट्रीय महामार्गच्या अधीक्षक अभियंता वृषाली गाडेकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मौजे सादोळा जवळील छोट्या पुलाचे जोडरस्त्याचे काम, मौजे सावंगीगंगा किनारा येथील गोदावरी नदीवरील पुलाचे चालू असलेले काम, मौजे सावंगीगंगा किनारा गावाजवळ छोट्या पुलांचे व जोडरस्त्याची कामे, मौजे श्रीष्टी येथील चालू असलेली कामे मार्च २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावी. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने माजलगाव शहरातील नालीचे बांधकाम तात्काळ पूर्ण करावे, असे निर्देश पवार यांनी दिले.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग ५४८ (सी) मधील माजलगाव शहरातील नालीचे बांधकाम करणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे, पाईपलाईनचे काम पूर्ण करणे, माजलगाव ते परतूर पॅकेजचे काम पूर्ण करणे, माजलगाव ते केज पॅकेजमधील रस्त्याची दुरुस्ती करणे आदी कामांविषयी चर्चा झाली.