
mumbai
tendernama
मुंबई (Mumbai) : मुंबईत सुरु असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तब्बल 70 हजार 686 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर नियमित कामांसाठी 19 हजार कोटींहून अधिकची गरज आहे. एकंदर मुंबई महापालिकेचा गाडा हाकण्यासाठी तब्बल 90 हजार 309 कोटी रुपयांची गरज आहे. महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीचा आढावा घेण्यात आला.
महापालिकेच्या 87 हजार 131 कोटी 57 लाख रुपयांच्या ठेवी आहे. यातील 31 हजार 323 काेटी 89 लाख रुपयांच्या ठेवी या कर्मचाऱ्यांची विविध देणी, कर्मचाऱ्यांसंदर्भातील मुदतठेवी, कंत्राटदारांची अनामत रक्कम तसेच इतर देण्याचा निधी आहे. तर, मुंबईच्या विकासासाठी वापरता येतील अशा 55 हजार 807 कोटी 68 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. या सर्व ठेवींमधून महापालिकेला 1 हजार 200 कोटी रुपयांपर्यंतचे व्याज मिळाले आहे. ठेवी 55 हजार कोटींच्या असताना महापालिकेने नियोजित केलेल्या प्रकल्पांचा खर्च 70 हजार कोटी रुपयांच्यावर आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे दायित्व म्हणून 19 हजार 622 कोटी 87 लाख रुपयांची गरज आहे. तर, आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी 7 हजार 399 काेटी 58 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेचे सध्या कोस्टल रोड, मुलूंड गोरेगाव जाेड रस्ता, कचऱ्या पासून वीज निर्मिती यासह रुग्णालयांचा विस्तार असे महाकाय प्रकल्प सुरु आहेत. तर, सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा प्रकल्प येत्या काळात सुरु होण्याची शक्यता आहे. अशा विविध महत्वाच्या प्रकल्पांसाठी महापालिकेला तब्बल 70 हजार 686 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
प्रकल्प आणि खर्च (कोटी)
-सागरी किनारी मार्ग - 7372.62
-गोरेगाव मुलूंड जोड रस्ता -7847.66
-कचऱ्या पासून वीज निर्मिती - 6207.34
-सांडपाणी प्रकि्रया केंद्र -15693.00
-पिंजाळ प्रकल्प - 14390.00
-जलबोगदे- 2650.00
-सायकल ट्रॅक -307.13
-मोठ्या जलवाहिन्यांची कामे -387.07
-मलवाहिन्या टाकणे - 428.16
-मिठी नदी प्रकल्प - 4033.15
-नद्यांचे पुनरुज्जीवन - 1832.28
-आश्रय योजना -4251.18
-विविध रुग्णालयांचा विस्तार, भांडूपमध्ये नवे रुग्णालय व इतर -3804.05