'जायकवाडी'तील जॅकवेल 'मजीप्रा'ची डोकेदुखी वाढविणार? कारण...

Jayakwadi Dam
Jayakwadi DamTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद खंडपीठाने दणका देताच जायकवाडी धरणात जॅकवेल (उद्भव विहीर व पंपहाऊस) बांधण्याची परवानगी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने पंधरा दिवसांपूर्वी दिली. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला (मजीप्रा) मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र धरणातील जलसाठा आठ मीटर म्हणजेच तिसऱ्या मजल्याइतके पाणी असल्याने व अद्याप पावसाळा सुरूच असल्याने, तसेच ऑक्टोबर महिन्यात देखील बिगर मोसमी पावसामुळे हा जॅकवेल उभारण्यासाठी मजीप्राला एकडे आड तिकडे विहीर अशी गत होणार आहे. याला किमान दोन ते अडीच वर्षाचा काळ लागू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

Jayakwadi Dam
चांदणी चौक : सातारा, मुंबईकडे जाणाऱ्यांसाठी 'हे' पर्यायी मार्ग...

मजीप्राचा पर्याय पण...

जर धरणाच्याबाहेर दोनशे फुटावर हा जॅकवाल बांधला आणि धरणातून एक किलोमीटर अंतरापर्यंत जलवाहिनीने जॅकवेलमध्ये ओढले तर या संकटावर मात करता येईल. तशी संकल्पना देखील एमजीपीच्या अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्यापुढे मांडली होती. मात्र केंद्रेकरांनी धरणातच जॅकवेल बांधावा, असे आदेशित केल्याने एजीप्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

यापूर्वी धरणात जॅकवेल बांधण्यासाठी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने मजीप्राला वनवन पछाडले. न्यायालयाच्या आदेशाने परवानगी मिळाली. पण आता पावसाची आडकाठी बनली.  त्यात धरणात पाण्याची पातळी आठ मीटर वाढल्याने यापुढे देखील पातळीत वाढ होतच आहे. आधी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने धरणात जॅकवेल उभारणीसाठी हव्या असलेल्या परवानगीसाठी वर्षभराचा कालावधी गेला. त्यामुळे जर परवानगी देताना मंत्रालयाने जागा बदलली तर केलेला विकास आराखडा वाया जाईल याभितीपोटी मजीप्राने जॅकवेलचा विकास आराखडा तयार केला नव्हता. परवानगी दिल्यानंतर मजीप्राने धरणामध्येच जॅकवेल बांधण्यासाठी नागपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून संकल्पचित्र तयार करून घेण्यासाठी हालचाली देखील सुरू केल्या. पण पावसाचा जोर अधिक असल्याने मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीतसुनिल केंद्रेकर यांच्यासमोर जॅकवेल स्थलांतराबाबत विषय मांडला. मात्र केंद्रेकरांनी त्यास नकार दिला.

Jayakwadi Dam
धुळे-चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात ठेकेदाराचा हलगर्जीपणा

नवीन पाणी पुरवठा योजनेची सद्यःस्थिती

● जायकवाडी धरणातील जॅकवेल ते नक्षत्रवाडी जलशुध्दीकरण केंद्र या १० किमी अंतरापैकी ५ किमी अंतराचे पाईप आले आहेत. यातील २ किमी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि खोदकामादरम्यान खड्ड्यात पाणी लागत असल्याने व्यत्यय येत आहे.

● नक्षत्रवाडीतील डोंगरावर जलकुंभाचे काम चालू आहे. खालचे बांधकाम संपले आहे. आता केवळ स्लॅब बाकी आहे. या व इतर संबंधित कामाला सव्वा वर्षाचा कालावधी लागेल. यात ब्लाॅस्टींग करताना झालेल्या कामास धोका पोहोचत असल्याचे मोठे तांत्रिक कारण आहे.

● नक्षत्रवाडी जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या जलकुंभातून थेट शहराच्या प्रत्येक टाकीला जलवाहिने जोडणार. यातील एकूण ६० किलोमीटरचे पाईप आले आहेत. यापैकी १० किमीच्या पाईपलाईनचे काम झाले आहे.

● शहरात एकूण ५३ जलकुंभांपैकी ३२ जलकुंभांचे काम सुरू आहे. 

● शहरातील टाक्यांमधून विविध भागात १९९१ किलोमीटरचे अंतर्गत जलवाहिण्यांचे कामापैकी सातारा - देवळाईसह १७० किमीचे काम झाले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com