छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) तसेच जिल्हा परिषदेसह विविध सरकारी कामकाजानिमित्त शहरात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जिल्हापरिषदेमार्फत (ZP) दोन मजली शेतकरी भवन बांधण्यात आले होते. मात्र काही दिवसांच्या वापरानंतर तेथे जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा कार्यालय झाले होते. त्याचेही स्थलांतर झाल्यानंतर या सरकारी इमारतीचे खिडक्या-दरवाजे चोरीला गेले असून, इमारतीला भूतबंगल्याचे स्वरूप आले आहे.
मराठवाड्याची विभागीय राजधानी छत्रपती संभाजीनगर शहरात इतर जिल्ह्यांप्रमाणे शेतकरी भवन व्हावे, अशी मागणी १९७० ते १९७४ च्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. अनेक वर्षे मागणी लावून धरल्यानंतर अखेर १९७४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांची मागणी मान्य करत जिल्हापरिषदेला निधी उपलब्ध करून दिला होता. त्यांच्याच हस्ते येथील नूतन वास्तूचे २२ ऑगस्ट १९७४ रोजी उद्घाटन करण्यात आले होते.
नारळीबाग हा परिसर शहराच्या मध्यभागी असल्याने त्यावेळची जुन्या मोंढ्यातील येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, मध्यवर्ती बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, महानगरपालिका, पोलिस आयुक्तालय तसेच जिल्हा न्यायालय व जिल्हा परिषदेसह या मुख्य व इतर सरकारी कार्यालय जवळ असल्याने तेथे शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ४९ वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुढाकाराने अखेर शेतकरी भवनाचे दरवाजे बळीराजाच्या निवासासाठी उघडले गेले होते.
अन्य जिल्ह्यांप्रमाणे शेतकरी भवन सुरू होऊन ते शेतक-यांना अल्पदरात वापरावयास मिळत होते. निवासाची सोय करून शेतक-यांना दिलासा दिला जात होता. विशेष म्हणजे येथे छोटे - मोठे शेतकरी मेळावे पार पडत असत. विविध शेतीपूरक उद्योगांबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जात होती.
ऐकेकाळी शेतात उत्पादित झालेला माल घेऊन शेतकरी रात्री-अपरात्री जुन्या मोंढ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत येत असे. अशावेळी शेतक-यांच्या निवासाची अडचण होते. ही बाब लक्षात घेऊन नारळीबाग ठिकाणी भव्य दोन मजली शेतकरी निवासाची उभारणी करण्यात आली होती. तेथे स्वतंत्र खोल्या, सामाईक कक्ष, स्वच्छतागृह आणि आंघोळीसाठी वापर अशी सोय केली होती. त्यासाठी सामान्य शेतकऱ्यांना परवडतील असे दर आकारले जात होते.
तथापी कालांतराने जुन्या मोंढ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सिडको भागातील जाधववाडीत स्थलांतर झाले. प्रवासाची साधने वाढली. शेतकरी भवन ओस पडले. पुढे कारभाऱ्यांनीही इमारतीची दक्षता घेतली नाही. सद्यःस्थितीत इमारतीची सादळलेल्या भिंती, खराब झालेली विद्युत उपकरणे, उघड्या डीपी, तुटलेल्या खिडक्या - दरवाजे अशी अवस्था झाली आहे.