छत्रपती संभाजीनग (Chhatrapati Sambhajinagar) : पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक असलेले झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे छत्रपती संभाजीनगर शहरातून गायब झाले आहेत. परिणामी, रस्ते सुरक्षा नियमांबाबत महानगरपालिकेची कमालीची उदासीनता दिसून येत आहे.
स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सर्वच सिग्नल चौकात झेब्रा क्रॉसिंग आवश्यक आहे. शहरातील अनेक रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे दिसेनासे झाले आहेत. सर्वच चौकात पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे मारण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर असते.
कॅम्ब्रीज, विठ्ठलनगर, रामनगर, मुकुंदवाडी, एपीआय क्वार्नर, सिडको जळगाव टी पाॅईंट, सेव्हन हिल्स, आकाशवाणी, मोंढानाका, अमरप्रीत, क्रांतीचौक, अदालत रोड, महावीर चौक, रेल्वेस्टेशन, सिडकोतील जळगाव रोडवरील एसबीआय, वोख्हार्ड, आंबेडकरनगर, शरद टी पाॅईंट, हर्सुल टी पाॅईंट, मिल क्वार्नर अशा महत्वाच्या काही परिसरात गेल्या वर्षभरापासून अनेक चौकातील पांढरे पट्टे गायब झाले आहेत.
सहा महिने, वर्षभराने पांढरे पट्टे पुन्हा रंगविणे आवश्यक असते. काही ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे, खोदाईचे काम करण्यात आले; नंतर मात्र पांढरे पट्टे मारलेच नाहीत. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यावरून जागा दिली पाहिजे, हे बहुतांश वाहनचालकांना माहीत नाही. पांढरे पट्टे दिसत नसल्याने वाहनचालक सिग्नलच्या पुढे जाऊन थांबत आहेत. बेशिस्तपणे कोणी कोठेही थांबत आहेत. पट्टे दिसत नसल्याने पोलिसही वाहनधारकांवर कारवाई करू शकत नाहीत.
काळे आणि पांढरे पट्टे का?
काळे आणि पांढरे पट्टे व्यक्तीला धोक्याची जाणीव करून देतात, असे मानसशास्त्र सांगते, म्हणूनच रस्ता सुरक्षेत त्याची निवड केली गेली. झेब्रा क्रॉसिंग रस्त्यावरील सुरक्षेचे काम करतो. यासाठी ते सुस्थितीत आणि ठळकपणे असणे गरजेचे आहे. झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल व्यवस्था यासह वाहतूक नियोजनाच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाला आपल्या जबाबदारीचा विसर पडला आहे.
चौकाचौकांत झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे नसल्याने वाहनचालक सिग्नलच्या पुढे जाऊन थांबतात. पादचाऱ्यांना रस्ताच मिळत नाही. महानगरपालिका प्रशासनाने या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे.