
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : माॅल्स, पंचतारांकीत हाॅटेल्स रुग्णालये आणि मंगल कार्यालयांनी हद्द सोडून पाय पसरले. त्यामुळे रस्त्यारस्त्यांवर वाहने उभी केलेली दिसतात. फेरीवाले, ऑटोवाल्यांनी सगळे चौक अडवले. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होतो.
मंगल कार्यालये, मोठी रुग्णालये, खासगी आणि सरकारी कार्यालये तसेच माॅल्स आणि बड्या व्यापाऱ्यांनी पार्किंगच्या जागाही गिळल्या. त्यामुळे मोठ्या रस्त्यांच्या गल्ल्या झाल्या. सामान्य नागरिकाला ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची शिक्षा भोगावी लागते. त्यातच बाजारपेठांमध्ये पार्किंगच्या जागा नाहीत, शहरात हॉकर्स झोन नाहीत, त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना, अशी स्थिती झाली आहे.
पार्कींगसाठी ३४ स्थळांचा ठराव गुलदस्त्यात
तत्कालीन मनपा आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी महानगरपालिकेत वाहतूक पोलिस अधिकारी आणि पालिका प्रशाकीय अधिकार्यांसमक्ष शहरात वेगवेगळ्या भागांत चौतीस ठिकाणी वाहनतळासाठी भूसंपादन करण्याचा आदेश दिला होता. मात्र, हा ठराव गुलदस्त्यात राहिल्याने वाहनतळाचा प्रश्न सुटत नाही. याउलट कारभाऱ्यांनी थेट गुळगुळीत रस्त्यांवरील बाजारपेठा, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर पेड पार्किंगचे धोरण आकारल्याने एकीकडे सामान्य नागरिकांची लूट सुरू केली आहे, तर पार्किंगचे पैसे पेड केल्याने वाहने रस्त्यांवरच लागून मोठ्या प्रमाणात कोंडी होते आहे.
या भागात आहे वाहतुक कोंडी
● शरद टी पाॅईंट ते टिव्ही सेंटर रोड
●शरद टी पाॅईंट ते हर्सुल टी पाॅईंट सर्व्हीस रोड
● सेव्हन हील ते जकात नाका
● जकात नाका ते टीव्हीसेंटर ते सिध्दार्थ चौक
● कॅनाॅट गार्डन
● सिडको टी पाॅईंट ते कामगार चौक, ते मुकुंदवाडी रेल्वे हाॅल्ट स्टेशन
● पीरबाजार ते फुलेनगर ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
● सेव्हनहील ते सिडको टी पाॅईंट
● सेव्हनहील ते महाविर चौक
● आकाशवानी ते त्रिमुर्ती चौक
● गजानन महाराज मंदिर ते जरभवानीनगर चौक
● सेव्हनहील ते सुतगिरणी चौक
● महावीर चौक ते पोलिस आयुक्त कार्यालय
● महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत परिसरातील रस्ते
● टाऊन हाॅल परिसर
● जिल्हाधिकारी कार्यालय ते गणेश काॅलनी
● प्रोझोन माॅल ते भारत बाजार
● एमजीएम व जेएनईसीसह मॅक्स हाॅस्पीटल
● शहरातील सर्व हाॅस्पीटल, मंगल कार्यालये आणि बाजारपेठ
बड्यांना अभय; छोट्यांना धमक्या
हापालिका हातगाड्यांवर कारवाईसाठी जाताच युनियनचे लोक आधी आम्हाला हाॅकर्स झोन द्या, जोपर्यंत आम्हाला आमच्या उपजीविकेसाठी सुविधा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही रस्त्यांच्या कडा सोडणार नाहीत, असे म्हणत हे लोक सुप्रीम कोर्टाचे मार्गदर्शक तत्वे दाखवतात. परिणामी हातगाडीवाल्यांवर कारवाई न करताच पथक निघून जाते; पण न्यायालयाची ऑर्डर आहे, असे म्हणत सर्वसामान्य गोरगरीबांच्या हक्काच्या दुकानावरील पत्र्याचे सावलीचे शेड महापालिकेतील कारभारी नजर जाताच मोठा लवाजमा सोबत घेऊन काढून टाकत आहे. दुसरीकडे ज्या बड्या बिल्डरांनी, नामांकीत डाॅक्टरांनी आणि मंगल कार्यालयवाल्यांनी पार्किंगच्या जागा गिळंकृत करून रस्तेच वाहनतळासाठी गायब केले आहेत.त्यावर कारवाईची जबाबदारी टाळली जाते.
खासदार जलील यांचा प्रश्न
केवळ वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे रस्ते व फुटपाथवरील अतिक्रमण काढा आणि नागरिकांची वाट मोकळी करा, असे न्यायालयाचे आदेश असताना महापालिकेने चुकीची कारवाई सुरू केली. महापालिकेतील कारवाईच्या या चुकीच्या दिशेवर 'टेंडरनामा'ने खा. इम्तियाज जलील व अन्य लोकप्रतिनिधींकडे प्रश्न उपस्थित केला होता.
जलील यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी मंगल कार्यालये, रुग्णालये, पंचतारांकीत हाॅटेल्स, बडे व्यापारी यांच्यावर कारवाई का करत नाही, असा सवाल करत महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि थेट न्यायालयालाच पत्र लिहून सिडको - हडकोतील अतिक्रमणांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
वाहतूक पोलिसांचे मौन
विशेष म्हणजे रस्त्यावर अथवा रस्ता शोल्डर व फुटपाथवर वाहने लागत असतील तर शहर वाहतूक शाखेला कारवाईचे अधिकार आहेत. मात्र बेशिस्त वाहनांना शिस्तित आणायचा प्रयोग म्हणून वाहतूक शाखा फोटो काढून ऑनलाईन पावती पाठवत कोट्यवधीची माया जमा करत आहे. मात्र रस्त्यांवरील अनधिकृत वाहनतळांवर कारवाई करण्यासाठी कानाडोळा करत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पार्किंगचा कचरा
तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सरकारी जागेतील अतिक्रमण काढून तिथे कोट्यवधी रुपये खर्च करून पार्किंगची व्यवस्था केलेली असतानाही या कार्यालयात कामानिमित्त येणारे लोक रस्त्यावरच गाड्या लावतात. त्यामुळे या भागातही वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यातच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने दररोज फूटपाथवर उपोषणाचे अनेक तंबू टाकले जातात. उपोषणकर्त्यांची वाहने निम्मा रस्त्यावरच व्याप वाढवत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहतुकीची कोंडी होते. या ठिकाणी येणार्या लोकांची संख्या जास्त असल्याने अडचणीत भर पडते.
काल्डा कॉर्नर
अमरप्रीत ते शहानूरमियाँ दर्ग्याकडून जाताना अनेक दुकानदार, रुग्णालये तसेच फळे व भाजी विक्रेते, चाट दुकाने, बांधकाम व्यावसायिक व पान ठेल्यांनी रस्ता काबीज केला आहे. त्यामुळे या भागातही वाहतुकीची कोंडी होते. पद्मावती रुग्णालयापर्यंत 9 मीटर रस्त्यावर तर तब्बल तीन मीटरपर्यंत वाहनेच उभी असतात.येथील धनदांडग्यांनी पार्कींगच्या जागेतच दुकानदारी थाटली आहे.
गजानन महाराज मंदिर चौक
गजानन महाराज मंदिर चौकात मंदिरात येणार्या भाविकांची वाहने एकीकडे, तर दुसरीकडे हातगाडीवाले आणि रिक्षा स्टँडची गर्दी असते. हेडगेवार रुग्णालयाकडे जातानाही रिक्षा स्टँड आणि पूजेचे साहित्य विकणार्यांची गर्दी असते. तसेच पुंडलिकनगरकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा वाहनतळ, भाजीविक्रेते आणि रिक्षांची गर्दी असते.
रामायणा कल्चरल हॉल
उल्कानगरीत असलेला हा चौक खूपच धोकादायक आहे. भारतमाता पथ ते जवाहरनगरमार्गे लोकमित्र पोलिस कॉलनीकडे जाणार्या या रस्त्यावर अनेक हातगाड्यावाले रस्त्याच्या दुतर्फा जागा बळकावून बसलेले दिसतात. याशिवाय मंगल केंद्राचे गाळे, दुकानवाले दोन्ही बाजूंनी शेड टाकून पार्किंगची जागाच अधिग्रहित करतात.
मुकुंदवाडी
मुकुंदवाडी गावातील अंतर्गत रस्त्यांवरच हॉकर्स झोन झाला आहे. कासलीवाल गार्डनमधून गावात जाणार्या रस्त्यावरच भाजी मार्केट झाल्याने वाहनधारकांना रस्ता शोधून सापडत नाही. त्यामुळे मुकुंदवाडी गावाकडे जाणार्या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होतो. अनधिकृत वाहनतळ, हातगाड्या आणि रिक्षा स्टँड असल्याने अडचण होते.
सूतगिरणी चौक
जवाहरनगरकडून चौकाकडे येताना सुसाट वेगाने धावणार्या वाहनांचा वेग कमी करणारा गतिरोधक नाही. विभागीय क्रीडा संकुलाकडे जाणार्या रस्त्यावर पान ठेले आणि हातगाडीवाल्यांनी कब्जा केला आहे. तसेच शिवाजीनगरकडे जाणार्या रस्त्यावर हीच परिस्थिती असल्याने चौकात वाहतुकीचा खोळंबा होतो.
हे आहेत जबाबदार
बड्यांनी पार्किंगच्या जागा दाखवल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेतली. त्यानंतर त्या गिळंकृत केल्या. व्यापार्यांनी नियमाप्रमाणे असलेली हद्द सोडून दुकाने व प्रतिष्ठाने पुढे आणून रस्ते अडवले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून खासगी कार्यालये, रुग्णालये आणि अन्य लोकांनी रस्ते लहान करून टाकले आहेत; परंतु त्यांच्यावर कधी अतिक्रमण हटाव पथक येते आणि थातूरमातूर कारवाई करते. तात्पुरता या सर्व गोष्टींवर फरक पडतो. लगेच रस्ते अडवण्याचे काम पुन्हा केले जाते. महापालिकेची ही स्थिती, तर पोलिसही याबाबत पाहिजे तेवढे गंभीर नसतात. या सगळ्याच यंत्रणा वाहतुकीच्या कोंडीला कारणीभूत आहेत. बिल्डर असो की व्यापारी आणि पालिका असो की पोलिस, प्रत्येकानेच आापापले काम व्यवस्थित केले तर.. खिशाचे 'अर्थ' कारण पूर्ण होणार नाही. परिणामी अर्थकारणासाठीच ठोस कारवाई केली जात नाही. परिणामी ही समस्या सुटता सुटत नाही.
या आहेत अडचणी...
चौकात खांब
शहरातील बहुतांश चौक अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. जेथे वाहनाचे वळणमार्ग अडतात त्या ठिकाणी विद्युत खांब उभे आहेत.
हॉकर्स झोन नाहीत
शहरात ११५ वॉर्ड आहेत; पण एकाही ठिकाणी हॉकर्स झोन नाही.
गुलमंडीतील काॅक्रिटीकरण अयोग्य
गुलमंडीचे रुंदीकरण झाले; मात्र पालिकेने रस्ते बांधकाम करताना कोपरे सोडले. ग्राहक, दुकानदार तेथे वाहने लावतात. या बाजारपेठेत कायम वाहनांच्या वाहतुकीमुळे पायी चालणेही अवघड होऊन जाते.
पार्किंग झोन नाहीच
शहर वाढले, पण रस्ते तेच आहेत. रस्त्यांवर दररोज वीस ते २५ हजार दुचाकी, चारचाकी वाहने वेगवेगळ्या भागांतील बाजारपेठा, रुग्णालये, भाजीफळ विक्रेते, चाट भांडार यांच्यासमोर उभी असतात. रस्त्यालगत बांधकाम करताना छोटीशी जागाही भूखंडधारक वाया घालवत नाहीत. शहरात सगळीकडे रस्त्यालगत घरे असतील तर निचे दुकान उपर मकान ही सिस्टिम झाल्याने रस्त्यालगत भूखंड घेताना भूखंडधारक व्यावसायिक जागा असेल तर पार्किंगचा विचार करीत नाहीत. रहिवासी झोन असेल तरी भाडेतत्त्वावर देण्यासाठी दुकाने काढतात व भाड्या तोड्याची व्यवस्था करतात. दुकाने झाल्यावर ग्राहक व दुकानदारही रस्त्यावरच वाहने लावतात.
पालिकेवरही जबाबदारी
शहरातील बेलगाम वाहतुकीला लगाम लावण्यासाठी प्रमुख चौक व रस्ते याची जबाबदारी वाहतूक शाखेकडे आहे, तर अंतर्गत रस्ते आणि चौक तसेच प्रमुख रस्त्यांवरील भाजी व फळ विक्रेत्यांना हटवण्याची जबाबदारी मनपाच्या प्रशासकीय विभागाकडे आहे. शहरात हॉकर्सची संख्या २० ते २५ हजारांच्या वर आहे, तर शहरातील अंतर्गत, मुख्य रस्त्याची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्या प्रमाणात पालिका प्रशासकीय विभागात दोन मिनी ट्रक, २० कर्मचारी, १ प्रशासकीय अधिकारी, ६ बिल्डिंग इन्स्पेक्टर, १ विशेष प्रशासकीय अधिकारी, अशा २८ लोकांवर भार आहे. त्यामुळे इच्छा असूनही पालिका प्रशासन ही जबाबदारी पेलू शकत नाही.
हे आहेत उपाय...
येथे असावेत पार्किंग झोन
शहरातील गुलमंडी, निराला बाजार, सिडको, हडको कॉर्नर, कॅनॉट मार्केट, सुगिरणी चौक, मुकुंदवाडी परिसरात पार्किंग झोन वाढवायला हवेत. याबाबत मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पार्किंग झोन तयार करण्याची घोषणा केली होती; पण अद्याप त्याचे काम झालेले नाही. विषेशतः बहुतांश भागात पार्किंगसाठी 'त्या' ८९ आरक्षित जागा मोकळ्या करणे अपेक्षित आहे.
पार्किंगची अट घाला
प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यालगत इमारत बांधकाम करणार्या बिल्डरांना विकास नियंत्रण नियमातील तरतूदीत बदल करून पार्किंगच्या जागा ठरवूनच बांधकाम परवाना दिला पाहिजे. पार्किंगच्या जागेत अनधिकृत बांधकाम असेल तर भोगवटा प्रमाणपत्र नाकारले पाहिजे.
कलम १०२ लावलेच पाहिजे
रस्त्यावर उभ्या राहणार्या अनधिकृत रिक्षा, फळभाजी विक्रेते, हॉकर्स यांना हटवण्यासाठी हद्दीतील पोलिस ठाण्याच्या बीट मार्शलने कलम १०२ नुसार कारवाई केल्यास वचक बसेल.
कॉर्नर मोकळे करा
शहरातील बहुतांश कॉर्नर अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. ते मोकळे करावेत. तसेच रस्त्यात असणारे खांबही काढावेत. याशिवाय शहरात ११५ वॉर्ड आहेत. या प्रत्येक वॉर्डात हॉकर्स झोन उभारावेत. यातून त्या त्या भागातील लोकांची सोय होईल व रस्तेही मोकळे राहतील.
पार्किंग झोन वाढावेत
शहरात पार्किंग झोन वाढवायला हवेत. नागरिकांनीही वाहतूक शाखेला मदत करायला हवी. सर्वांनीच वाहने लावताना चालणार्या लोकांचा विचार करावा.
पर्यायी रस्त्यांचा वापर करावा
जिथे मोठ्या बाजारपेठा आहेत, तिथे इन आऊट गेट तयार करावेत. खरेदी व्यतिरिक्त या रस्त्यांचा वापर करणाऱ्यांना पायबंद करावे. बाजारपेठेच्या काही अंतरावर बाजारातील वाहनांचे सर्वेक्षण करून मोठे वाहनतळ ग्राहकांना उपलब्ध करून तेथे मोफत सेवा उपलब्ध व्हावी.