सरकारच्या नाकावर टिच्चून गावकऱ्यांनी करून दाखवले! येणार तब्बल 6 कोटींचा खर्च

Somthana
SomthanaTendernama

Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : 'एकीचे बळ, मिळते फळ' या म्हणीचा प्रत्यय जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा या गावात येतो आहे. या गावासह बदनापूर, बाजार गेवराई, ढवळापूरी, माळेवाडी, सोमठाणा, दुधनवाडी, खडकवाडी, पिरसावंगी, अकोला निकळक, वरूडी, कडेगांव, सैय्यदपूर, औरंगपूर, लाड सावंगी, देमनी वाहेगाव, सागरवाडी, ढासला आदींसह पंचक्रोशीतील इतर‌ पन्नास गावातील ग्रामस्थांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून काम हाती घेतले असून, त्यावर जवळपास सहा कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

सुमारे पंधरा हजार ग्रामस्थांनी गाळ काढण्याच्या कामात योगदान देत अप्पर दुधना प्रकल्प अंतर्गत सोमठाणा धरण गाळमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. या कामातून शासनाचे तब्बल सहा कोटी रुपये वाचणार असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाला आचारसंहिता लागण्यापूर्वी २५ एप्रिल २०२४ रोजी रोजी गाळ काढण्यासाठी मागणी केली होती. मात्र या विभागाची व लोकप्रतिनिधींची उदासिनता पाहून शेतकऱ्यांनीच पावसाळा जवळ येत असल्याचे पाहून रितसर पाटबंधारे विभागाची मंजूरी घेत लोकसहभागातून एक नावीन्यपूर्ण आदर्श पॅटर्न राबवत आहेत. या उपक्रमातून येथील शेतकऱ्यांनी जल व्यवस्थापनाचा नवा आदर्श घालून दिला आहे. 

जालना रस्त्यापासून चार किलोमीटर अंतरावरील रेल्वे गेट क्रमांक - ६८ पुढे दुधनवाडी गाव आहे. या गावापासून पुढे सोमठाणा रस्त्यालगत डोंगरावर रेणूकामाता मंदिर आहे. छत्रपती संभाजीनगर - जालन्याच्या सीमेवरून मुंबई - नागपूर समृध्दी महामार्ग जातो.‌ याच महामार्गाच्या विरूध्द दिशेला सोमठाणा हद्दीत हे धरण आहे.

सोमठाणा हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे निसर्गरम्य पर्यटन ठिकाण आहे. भाजपचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात हे धरण असून, भाजपचे नारायन कुचे हे विद्यमान आमदार आहेत. बदनापूर तालुक्यातील वाढते शहरीकरण, वाढते पर्यटक, वाढती लोकसंख्या यामुळे शहरासह आसपासच्या ग्रामस्थांची पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे. सोमठाणा धरणानेही तळ गाठल्याने आसपासच्या ५० गावात ग्रामपंचायतीकडून अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे येथील ग्रामस्थांना दिवसेंदिवस भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

जूनचा पाऊस पडेपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी उलपब्ध होत नाही. त्यामुळे आसपासच्या गावात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. बदनापूर तालुक्यात  सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६५१ मिमी आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र २४८ चौरस मीटर आहे. धरणात जलसाठ्याची साठवण क्षमता १३ दलघमी ते १५.३९ दलघमी आहे. धरणाची लांबी ८ किलोमीटर आहे.‌

सोमठाणा येथे ३१ जानेवारी १९६५ मध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री रफिक झकेरिया यांच्या हस्ते या अप्पर प्रकल्प दुधना धरणाचे उद्घाटन करण्यात आले होते. या धरणाचा परिसरातील जिमठाणा, दुधनवाडी, गोकुळवाडी, अकोला निकळक, धोपटेश्वर, देवगाव, कस्तुरवाडी, अंबडगाव आदी गावांना या धरणाचा समावेश होतो. या धरणातून सोडण्यात येणा-या पाण्याचा फायदा पिकांना होतो. मात्र, सध्या या धरणात मुबलक पाणी नसल्याने पाण्याची पातळी खालावलेली आहे.

अप्पर दुधना प्रकल्प हा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्याच्या कामाला १९६२ या वर्षी सुरवात झाली होती व १९६५ या वर्षी काम पूर्ण झाले होते. यासाठी ८१ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. या प्रकल्पातून एकूण ५० गावांना सिंचनाचा फायदा होतो. प्रकल्प गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे.

आसपासच्या ५० गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातच ५० विहिरी आहेत. याच धरणातून  पाणीपुरवठा केला जातो. या धरणातील गाळ २०१९ मध्ये काढण्यात आला होता, असा दावा पाटबंधारे खात्याने केला असला तरी धरणाची साठवण क्षमता कमी आहे. धरणाची पाळू २ किलोमीटर आहे. धरणाऱ्या दुरुस्तीकडे पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळे त्यातून पाणी झिरपत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मार्चमध्ये धरण कोरडे पडते. अन्य ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना या धरणावर आधारित आहेत. त्यामुळे आसपासच्या गावांना बंधाऱ्यातून मुबलक पाणीपुरवठा होत नाही. बंधाऱ्यावरील पाणीपुरवठा योजना जुनी आहे. पाइपलाइन जुनी, जीर्ण व नादुरूस्त झाली आहे. गतवर्षी पाऊस समाधानकारक पडलाच नाही. त्यामुळे धरणावर अवलंबून असणाऱ्या गावातील पाण्याचे संकट उभे राहिले. विहिरींची पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली. गावागावात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

पाणीटंचाईवर शाश्वत मात करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी धरण संवर्धन कार्यक्रमांतर्गत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना गाळ काढण्यासाठी विनंती केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. शेवटी या धरणावर अवलंबून असणाऱ्या ५० गावकऱ्यांनी धरण पुनरूज्जीवन मोहीम हाती घेतली. यंदा आठ दिवसापासून धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून लाखो रुपये जमा करत सहा पोकलेन, ५० हायवा, २ जेसीबी, ८ ट्रॅक्टर आदी यंत्रणा लावत धरणातील गाळ उपसा करून शेतकरी स्वखर्चाने शेतासाठी वाहून नेत आहेत.

दीड महिन्यापर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. २००४ ते २०१२ पर्यंत हे धरण कोरडेच होते.‌ २०१५ ला धरण चार तासात भरले होते. त्यानंतर २०१९ ते २०२२ पर्यंत तीन वर्ष सलग धरण भरले होते. मात्र नंतर पावसाने हुलकावणी दिल्याने धरणात जलसाठा कमी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

असा आहे धरणाचा गोषवारा

- १९६५ मध्ये धरणाचे बांधकाम पूर्ण 

- धरणाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी गोदावरी पाटबंधारे विभाग

- धरणाच्या बंधाऱ्याची लांबी २ किलोमीटर

- धरणाची उंची १७.६८मी. 

- पाणलोट क्षेत्र १५.६९ दलघन मीटर

कामातील महत्त्वाचे टप्पे 

- मोहिमेंतर्गत लोकसहभागातून धरणाची साठवण क्षमता वाढविण्यात येत आहे. गाळ काढून धरणाचे खोली- रुंदीकरण करण्यात येत आहे. धरणाची पाणी गळती रोखण्यासाठी ग्रामस्थांनी पाटबंधारे खात्याला विनंती केली आहे. बंधाऱ्याची भिंत दुरुस्त करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. सांडवा दुरुस्त करावा, असेही ग्रामस्थांनी सांगितले.

- प्रस्तावित कामातून २ लाख क्युबिक मीटर उपलब्ध होईल, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

- श्रमदानामध्ये सहभागी झालेल्यांची संख्या सुमारे १५०००

- लोकसहभागातून जेसीबी, पोकलेन, डंपर , ट्रॅक्टर आदी यंत्रसामग्री ८ दिवसांपासून ते ५०  दिवसांपर्यंत पुरवण्यात आली. त्यासाठी दररोज १५ ते २० लाख खर्च येत आहे. दीड महिन्यात सहा कोटी रुपये खर्च येणार. 

- बदनापूर तालुक्यात पाऊस कमी असल्याने धरणात जलसाठा कमी झाला आहे. असला तरी धरणातील नैसर्गिक झरे या कामांमुळे जिवंत झाले आहेत. त्यामुळे ५ फुटांपर्यंत पाणी साठले आहे व विहिरी भरल्या जात आहेत. भविष्यात धरण परिक्षेत्रात पर्यटनाच्या माध्यमातून उत्पनाचे स्रोत वाढवणे, उद्यान विकसित करणे, जलतरण तलाव बांधणे, सांडव्यावर कृत्रीम धबधबे निर्माण करणे, शांत निसर्गरम्य निवारे उभे करणे, पक्षी मित्र, प्राणी मित्र, निसर्गप्रेमी यांना निसर्ग निरीक्षणासाठी प्रक्षेत्र विकसित करणे ही कामे प्रामुख्याने पाटबंधारे खात्याने हाती घेतली तर या भागात आर्थिक विकासाला पाठबळ मिळेल, असे मत नागरिकांनी टेंडरनामाशी बोलताना सांगितले.

पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

सालाबादप्रमाणे धरणातील गाळ काढणे व धरणातील तसेच बंधाऱ्यावरील काटेरी झाडाझुडपांचा नायनाट करणे ही जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे. मात्र याकडे संबंधितांचे दुर्लक्ष आहे. या धरणात गाळ साचल्यामुळे आणि काटेरी झाडांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिसत नाही. दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच धरणातील गाळ काढून काटेरी झुडपे काढणे आवश्यक होते. मात्र, अप्पर दुधना प्रकल्पातील अधिका-यांनी काही वर्षांपूर्वी धरणात पाणी नसताना पाटाची दुरुस्ती केली होती. तेव्हा धरणात पाणी नसताना चा-या, पाटाची दुरुस्ती का करण्यात आली, असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला गेला होता.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com