Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरातील 200 कोटींचा 'हा' महत्वाचा बायपास कधी पूर्ण होणार?

 Sambhajinagar
SambhajinagarTendernama

Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : जळगावहून छत्रपती संभाजीनगर शहरात येणाऱ्या नागरिकांची हर्सूल गावातल्या अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सुटावी यासाठी या रस्त्याला पर्याय म्हणून सावंगी ते मिटमिटा असा नवीन बायपास तयार करण्याचे काम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन वर्षांपूर्वी प्रस्तावित केले होते.

यापूर्वी गेली कित्येक वर्ष हा प्रकल्प जागतिक बँक प्रकल्पाकडे प्रलंबित होता. त्यांनी यासंदर्भात प्रकल्प आराखडा तयार करून प्रस्ताव तसाच धूळखात पडून होता. आजपर्यंत या महामार्गासाठी भूसंपादन झालेच नाही.‌ त्यानंतर हा राष्ट्रीय महामार्ग जागतिक बँक प्रकल्पाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सरकारने हस्तांतरित केला. यासंदर्भात संबंधित विभागाकडे विचारणा केली असता सरकारकडून मंजुरी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.

 Sambhajinagar
Mumbai To Shrivardhan : कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News! मुंबई ते श्रीवर्धन अवघ्या अडीच तासांत

हा राष्ट्रीय महामार्ग झाला तर शहरातील जालनारोडसह समृध्दी महामार्ग, धुळे - सोलापूर हायवेची कोंडी दूर होईल, नाशिक, नगर, पुणे, मुंबई, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तर महाराष्ट्राकडून येणारी जड वाहतूक शहरात अथवा धुळे - सोलापूर हायवे कडून केम्ब्रिज ते सावंगी बायपासला न जाता थेट सावंगीतून जळगावसह अजिंठा, धुळे आणि समृद्धी महामार्गाहून नागपूरहून येणाऱ्या प्रवाशांची सोय होईल. तर वेरूळ, नाशिक, पुणे येथे जाणाऱ्यांना शहरात येण्याची गरजच भासणार नाही.

छत्रपती संभाजीनगर - जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात हर्सूल गावातील अरुंद रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम झाले असले तरी ते अद्याप अर्धवट आहे. रुंदीकरण करून वाहतूक कोंडीवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. कारण हा रस्ता गावाच्या मध्यभागातून जात असल्याने ३० मीटरचा रस्ता ४०० मीटर रुंद केला. भूसंपादनासाठी  १७.७२ कोटी रुपयांचा मोबदला दिला. रुंदीकरणही झाले असले तरी या रस्त्यामुळे जळगाव रोडवरून शहरात येणाऱ्या वाहनांना हर्सूल गावातील कोंडीचा त्रास कमी झाला नाही.

 Sambhajinagar
जालना-नांदेड समृध्दी महामार्ग काम सुरू होण्यापूर्वीच चौकशीच्या फेऱ्यात; केंद्रीय दक्षता समिती सज्ज

यासाठी जळगाव रोडवरून येणाऱ्या ज्या वाहनांना शहरात न येता वाळूज, नगर, नाशिक, पुणे, मुंबई, धुळे, गुजराकडे जायचे आहे तसेच पूर्व मराठवाडा व विदर्भातील वाहनांना तिकडे जायचे असेल तर कॅम्ब्रीज ते सावंगी बायपासकडून मिटमिटा मार्गे जाणे सोपे होईल. हा प्रस्तावित मार्ग रेंगाळल्याने वाहनांना धुळे - सोलापूर हायवेकडून निपानी फाटा - झाल्टा फाटा - कॅम्ब्रीज - सावंगी बायपासमार्गे उलटा फेरा मारावा लागतो. यात वाहनांचा खुराक आणि वेळ दोन्ही वाया जातो. शिवाय शहरातील औद्योगिक व्यवस्थेवर देखील परिणाम होतो. धुळे - सोलापूर एकाच मार्गावर वाहनांचा लोड वाढल्याने रस्ता खराब तर होतोच शिवाय अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे.

त्यासाठी सावंगी ते मिटमिटा नवीन बायपासचा तयार करणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. याची जबाबदारी शासनाने  सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सोपवली होती. या विभागाने दोन वर्षांपूर्वी तसा प्रस्ताव पाठवला. मात्र अद्याप त्याला शासनाकडून मंजुरी मिळाली नाही. दुसरीकडे या शहरातील आमदार - खासदारांना देखील शहराची कोंडी व औद्योगिक विकासाला चालना देणारा हा प्रकल्प व्हावा इतकी त्यांच्यात दूरदृष्टी नाही. त्यामुळे शहराचा विकास खुंटलाय.

 Sambhajinagar
स्मार्ट प्रीपेड मीटर्स रद्द केल्याचे गाजर नको; अधिकृतपणे जाहीर करा तरच...

१२ किलोमीटरचा सावंगी-मिटमिटा बायपास जळगाव रोडवरील सावंगी येथील टोलनाक्यापुढील नायगाव जंक्शनहून उजवीकडचा रस्ता केंब्रिज चौकाकडे जातो, तर डावीकडचा रस्ता नायगाव येथे जातो. नवीन बायपास येथूनच प्रस्तावित आहे. येथे जागतिक बँकेने बांधलेला एक रस्ता आहे. नायगावहून सुरू होणारा बायपास मिटमिटा येथील फौजी ढाब्यामागे प्रस्तावित सफारी पार्कजवळ निघेल आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ ला येऊन मिळेल.

चारपदरी आणि ४५ मीटरची रुंदी असणाऱ्या रस्त्याची लांबी सुमारे १२ ते १५ किलोमीटर असेल. असा या रस्त्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता. यासाठी २०० कोटींचा खर्च अपेक्षित धरून राष्ट्रीय महामार्ग विभागाने अंदाजपत्रक तयार केले होते.

 Sambhajinagar
FASTag News : डोक्याला ताप... 'फास्टॅग'ही जाणार! आता टोल कसा भरायचा?

शासनाकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर  चार वर्षांत या बायपासचे काम पूर्ण होईल, असे गाजर राष्ट्रीय महामार्ग विभागाने छत्रपती संभाजीनगरकरांना दाखवले होते. याआधी जागतिक बँक प्रकल्पाने असेच गाजर दाखवले होते. मात्र नंतर त्यांच्याकडे निधी नसल्याने राष्ट्रीय महामार्गाकडे हे काम देण्यात आले. विभागाच्या वार्षिक नियोजन आराखड्यात या कामाला मंजुरी मिळाली असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला होता. मात्र मागील दोन वर्षांपासून अद्याप या राष्ट्रीय महामार्गाचा डीपीआर तयार करण्यासाठी टेंडर काढले नाही.

शासनानेच ग्रीन सिग्नल न दिल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हा महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग कधी होणार, हे अधिकाऱ्यांना देखील सांगता येत नाही. जर हा बायपास झाला तर नवीन बायपासचा ताण कमी होईल. नवीन बीड बायपास दक्षिणेला तर हा दुसरा बायपास उत्तरेला दोन सारख्या टोकाला असतील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com