Sambhajinagar News : स्मार्ट प्रवासी निवारा योजनेचा कोणी उडवला फज्जा; जबाबदारी कोणाची?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

Chhatrapati Sambhajinagar News छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांनी स्मार्ट शहरात बस थांबेल तिथे प्रवासी निवारे देखील उभारले. काही वर्षांच्या मुदतीत बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या योजनेंतर्गत शहरात १२३ थांबे उभारण्यात आले. मुंबईच्या एका बड्या जाहिरात कंपनीच्या कंत्राटदाराला ते काम देण्यात आले. मात्र संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील सर्वच बस थांब्यांचा फज्जा उडालेला आहे.

यासंदर्भात महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी श्रीकांत यांनी बोलार्डसह बसथांब्याची देखील चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र ही चौकशी थंडबस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकांच्या कामकाजावरच संशय निर्माण होत आहे.‌

Sambhajinagar
Ambulance Tender Scam : ऐन निवडणुकीत आली शिंदे सरकारची झोप उडविणारी बातमी

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून शहरात स्मार्ट बस थांबेल तिथे बसथांबे उभारण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या धर्तीवर शहरात १२३ बसथांबे उभारले. मात्र कंत्राटदारामार्फत उभारण्यात आलेल्या प्रवासी निवार्‍यांची देखभाल, टेंडर मधील अटी - शर्ती नुसार कंत्राटदाराने करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे सध्या स्मार्ट प्रवासी निवारे या योजनेचा फज्जाच उडाल्याचे दिसते.

प्रवासी निवार्‍यांवर सध्या कुणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच प्रवासी निवार्‍यांवर भिक्क्षुकांनी ताबा मिळविला आहे. येथील निवार्‍यांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे स्मार्ट बसथांब्याच्या नावाखाली ही योजना प्रवाशांसाठी डोकेदुखी बनली आहे.

शहरात प्रवासासाठी शहरबस सेवा हे प्रवाशांचे मुख्य साधन आहे. प्रवास करताना विविध बसस्थानकावर प्रवाशांना अनेक तास बसची प्रतीक्षा करीत ताटकळावे लागते. अनेक ठिकाणी प्रवासी निवाऱ्यांचा टेंडरमधील अटीशर्ती पायदळी तुडवत दिलेल्या संख्येनुसार न बांधल्याने  प्रवाशांना उन, वारा, पावसाचा मारा सहन करीत बसची वाट पाहावी लागत आहे.

Sambhajinagar
Nagpur News : 177 कोटींची विकासकामे मार्गी; टेंडर प्रक्रिया पूर्ण

स्मार्ट सिटीतील अशा चित्रामुळे ग्रामस्थांना देखील आपण खरोखर स्मार्ट शहरात आलोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.‌ संपूर्ण शहरात १५० प्रवासी निवारे उभारण्याची बोली असताना कंत्राटदाराने केवळ १२३ प्रवासी निवारे उभारले.‌ मात्र जिथे धोकादायक वळण आहेत, अशा मुख्य रस्त्यांवर फुटपाथवर प्रवासी निवारे उभारण्यात आले. यामागे केवळ मोक्याची जागा शोधून केवळ जाहिरातीच्या माध्यमातून जास्तीत जास्त महसूल कसा मिळेल याकडेच कंत्राटदाराने लक्ष ठेवत प्रवासी निवार्‍यांच्या दोन्ही बाजूला मोठमोठे जाहिरातीचे होर्डींग लावण्यात आले. तिथे लोकांना जाहिरात वाचता यावी म्हणून तिथे प्रकाशयोजना करण्यात आली. निवारे मात्र‌ अंधारात आहेत.

एकदा उभारणी केल्यानंतर कंत्राटदाराचे या प्रवासी निवार्‍यांकडे दुर्लक्ष केले. या योजनेकरिता स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांनी देखील दुर्लक्ष केले. यामुळे अनेक प्रवासी निवार्‍यांमध्ये स्वच्छतेच्या अभावाने सर्वत्र घाण पसरली आहे. अनेक निवार्‍यांना मोकाट जनावरे आणि भिक्क्षुकासह तळीरामांनी आपले आश्रयस्थान बनविले आहे.

Sambhajinagar
Nashik : डीपीसीकडून प्राप्त निधी खर्चात नाशिक जिल्हा परिषद विभागात अव्वल

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. मार्फत खाजगी तत्वावर अर्थात बांधा- वापरा आणि हस्तांतरीत करा अशा पंधरा वर्षांच्या करारतत्वावर स्मार्ट बसथांबे उभारण्यासाठी मुंबईतील प्रोॲक्टीव्ह आणि आउट ॲडव्हरटाईज प्रा. लि. या कंपनीला १५ जुलै २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. यात पहिल्या टप्प्यात ६८ आणि दुसऱ्या टप्प्यात ८२ बसथांबे उभारणीचे उद्दीष्ट कंपनीसमोर ठेवण्यात आले होते. कंपनीला जाहिरातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी पहिल्या वर्षी ४८ लाख ६० हजार रुपये महसूल स्मार्ट सिटीकडे जमा करणे आवश्यक होते. यात सालाबादप्रमाणे महसुलात पाच टक्के वाढ याप्रमाणे तीन वर्षात दीड कोटी रुपये कंपनीने देणे बंधनकारक असताना कंत्राटदारांकडून महसूल देखील वेळेवर जमा केला जात नाही.

प्रवासी निवार्‍यांमध्ये अस्वच्छता असल्याने निवार्‍यांबाहेर उभे राहून प्रवाशांना शहर बसची प्रतीक्षा करावी लागते. तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. विनायक निपुण यांनी चांगल्या उद्देशाने स्मार्ट प्रवासी निवारा ही योजना राबविली; पण सध्या प्रशासन, कंत्राटदाराच्या उदासितेमुळे मूळ संकल्पनेला हरताळ फासला गेला आहे. शहरात १२३ पैकी १०० प्रवासी निवारे उभे आहेत. यातील काही थांबे जलवाहिनी, रस्ता रुंदीकरणाच्या कामात जमीन दोस्त करण्यात आले आहेत. त्यांची परत उभारणी कोणी करावी यावर प्रशासन काही बोलायला तयार नाही.‌

अनेक प्रवासी निवारे बेवारस असून काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसते. त्यामुळे प्रवाशांना उन्हात वा झाडांचा आधार घेत बसची वाट पाहावी लागते. प्रवासी निवार्‍यांची दैनंदिन स्वच्छता करणे गरजेचे असताना त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com