छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सकाळी व सायंकाळी नागरिकांना विरंगुळ्यासाठी शहरात सिध्दार्थ उद्यान वगळता एकही दर्जेदार उद्यान नाही. सिडको सिडकोतील कॅनाट, श्यामाप्रसाद मुखर्जी, कॅटली, वाहतूक उद्यान तसेच सिध्दार्थ उद्यानातील वाहतूक उद्यान, सिडको एन वन टाउन सेंटर, हर्सुल स्मृतीदिन, ज्योती नगरातील कवितेची बाग, सहकार नगरातील लोककला उद्यान आदी महत्वाच्या उद्यानांची वाईट अवस्था असताना या उद्यानांची देखभाल दुरुस्ती करण्याऐवजी आता महानगरपालिका प्रशासकांनी अनेक नव्या उद्यानांची उभारणी करण्याचा निर्णय कशासाठी घेतला, हा संशोधनाचा विषय आहे.
आता शहरात आमखास मैदानाजवळील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या एकमेव जुन्या उद्यानाचा विकास होणार आहे. त्यानंतर सातारा - देवळाई व गारखेडा भागातील कारगिल उद्यानासह काही भागातील जागांची निवड करण्यात आली आहे. उद्यान विकास कामांना तातडीने सुरूवात होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यासाठी मंगळवारी त्यांनी उद्यान विकसित करण्यासंदर्भात पूर्व तयारीचा आढावा देखील घेतला आहे.
महानगरपालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ याचा पदभार घेताच मुलांनो, चला खेळुया या उपक्रमाची शहरभर रुजवात करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यासाठी त्यांनी लहान वयात मुले मोबाईलच्या आहारी जाऊन खेळांकडे दुर्लक्ष करतात याने त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो.
यासाठी महानगरपालिका हद्दीत महानगरपालिकेचे अनेक भूखंड आहेत, त्यांची वाइट अवस्था सुधारण्यासाठी आसपासच्या नागरिकांकडून दहा टक्के निधी जमा करून तसेच शहरातील नामांकित उद्योजकांच्या सीएसआर फंडातून तसेच भारतीय क्रीकेटपट्टू विराट कोहली, महेंद्रसिगं धोनी यांच्या ॲकेडमीत येथील मुलांना वाव मिळावा यासाठी दोघांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. २३ मे २०२३ रोजी जी. श्रीकांत यांनी मुलांनो, खेळायला चला ही संकल्पना मांडली होती, मात्र आजतागायत ती साकार झाली नाही.
आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महानगरपालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी अनेक नव्या उद्यानांची घोषणा केली. मंगळवारी महानगरपालिकेचे मुख्य उद्यान अधिकारी डाॅ. विजय पाटील यांनी विकसित केल्या जाणाऱ्या उद्यानांची माहिती पीपीटीद्वारे प्रेझेंटेशनद्वारे दिली. यात आमखास मैदानाजवळील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन उद्यानाचा कसा विकास होणार आहे, हे सादर करण्यात आले. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन स्मारक येथील तलावाचे सौंदर्यीकरण कसे राहिल, हे सांगितले. यावेळी मात्र तलावात १२ महिने पाणी कसे राहिल, याची काळजी घेण्याचा सल्ला जी. श्रीकांत यांनी दिला. आदीत्यनगर येथील महानगरपालिकेच्या खुल्या जागेवर उद्यान विकसित करणे, सिटी सर्व्हे क्र. ५३ गारखेडा येथील खुल्या जागेवर उद्यान विकसित करणे, सातारा गट क्रमांक ९१ , ९२ , ११७ येथील महानगरपालिकेच्या खुल्या जागेत नवीन उद्यान विकसित करणे आदी कामांची घोषणा करण्यात आली.
या उद्यानांचे काय ?
सिडको एन -१ टाऊन सेंटर सी सेक्टर येथील उद्यानाला गत दहा वर्षांपासून ताला लागलेला आहे. उद्यानात कमालीची बकाली आहे. त्यासोबतच शहरातील आलीशान वसाहतीतील उद्यानांची देखील महानगरपालिका प्रशासकांनी तितकीच तत्परतेने जागृतता दाखवावी. जुन्या कामांकडे दुर्लक्ष करून नवीन कामांचे टेंडर काढले जाते. एकदा विकास काम झाले, कंत्राटदाराची देणी फिटली की, तो सुरक्षा अनामत काढून पळ काढतो. नंतर पुरेशा मनुष्यबळा अभावी उद्यानांची वाट लागते.
कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो. त्यामुळे नवीन उद्यानांची निर्मिती करण्यापेक्षा जुण्या उद्यानांकडे महानगरपालिका प्रशासकांनी लक्ष द्यावे. सद्य:स्थितीत दुष्काळाचे सावट आहे. प्यायला पाणी नाही. नवीन उद्यानासाठी शहरात पुरेसा जलसाठा आहे का, महानगरपालिकेत उद्यानांची देखभाल दुरुस्तीसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आहे का, या प्रश्नांचा गुंता सोडवूनच प्रशासकांनी निधीची गुंतवणूक करावी, अशी चर्चा शहरभर सुरू आहे.