जीव्हीपीआरचा हलगर्जीपणा : खोदकामात अनियमितता, सुरक्षा वाऱ्यावर

MJP
MJPTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद येथील नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, दुसरीकडे भ्रष्ट कारभार थांबण्याचे नाव घेत नसल्याने ठेकेदाराच्या कामातील अनियमितता व चुका दिवसेंदिवस बाहेर येत आहेत. नवीन औरंगाबादसह जुन्या शहरात तसेच सातारा - देवळाईसह मनपा हद्दीतील इतर भागात गत तीन महिन्यांपासन नव्या - जुन्या अंतर्गत व मुख्य रस्त्याच्या बाजुला ठेकेदाराने जनरेटरचे भाडे, तसेच डिझेलची बचत आणि मनुष्यबळाचा कमीतकमी वापर व्हावा व स्वतःला जास्तीत जास्त आर्थिक फायदा व्हावा यासाठी कमी वेळात अधिक खोदकामासाठी चक्क जेसीबीचा वापर सुरू केला आहे. ठेकेदाराच्या या मनमानीकडे मात्र मजीप्रा आणि मनपा अधिकाऱ्यांचा कानाडोळा असल्याचे दिसून येत आहे.

MJP
औरंगाबाद रेल्वे स्थानकावरील वाॅटर व्हेंडिंग मशीन 5 वर्षांपासून बंद

असा बसतोय फटका

ठेकेदारांकडून सुरू असलेल्या अशा प्रकारच्या कामांमुळे नागरिकांच्या घरांना हादरे बसत आहेत. घरे आणि दुकानांच्या पायऱ्यांची तोडफोड होत असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. अशाच पध्दतीच्या खोदकामामुळे हेडगेवार रुग्णालयाची सुरक्षा भिंत कोसळली. त्याला लागूनच महापालिकेचा वाहतूक सिंग्नल तोडला. शिवाय शहरातील नव्याकोऱ्या रस्त्यांचे नुकसान होत आहे.

कुठेही सूचनाफलक नाहीत

जीव्हीपीआर कंपनीचा हलगर्जीपणा एवढ्यावरच थांबला नसून पाइपांसाठी खोदलेल्या नाल्यानजीक वाहनधारकांना सावधानतेचा इशारा देणारे सूचना फलक अथवा धोका टाळण्यासाठी लाल निशान देखील लावले जात नाहीत. खोदकामादरम्यान कोणत्याही सुरक्षा साधनांचा वापर केला जात नसल्याने औरंगाबादकरांच्या डोळ्यात मोठ्या प्रमाणावर धुळफेक सुरू आहे. शिवाय जागोजागी आरपार नाले अपघाताला आमंत्रण देत आहेत.

जलकुंभाचे काम अर्धवट

धक्कादायक बाब म्हणजे जलकुंभाचे काम दहा टक्के देखील पूर्ण झालेले नसताना कंपनीने संपूर्ण शहरातील रस्त्यांच्या कडेला, फुटपाथवर मोठमोठाले पाइप आणून टाकल्याने रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने अपघाताचे संकट उभे केले आहे. त्यामुळे औरंगाबादकरांसाठी नवीन पाणीपुरवठा योजना ही जीवन देणारी आहे की जीव घेणारी आहे, असा प्रश्न आता नागरिकांत निर्माण होऊ लागला आहे. 

MJP
'जलजीवन'च्या कामांचा बोजा केवळ 13 ठेकेदारांवर; दर्जाचे काय?

गुन्हा दाखल, मनमानी सुरूच

विशेष म्हणजे गत पंधरा दिवसापूर्वी चुकीचे खोदकाम केल्याने काही शेतकऱ्याच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात कंपनीवर गुन्हा देखील दाखल झाला आहे. त्यापाठोपाठ संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी आता औरंगाबादेतून जोर धरू लागली आहे. असे असताना कुणाच्या आशिर्वादाने कंपनीची दादागिरी वाढली आहे, हा संशोधनाचा विषय आहे.

कारभाऱ्यांची डोळेझाक 

ठेकेदाराच्या या मनमानी आणि हलगर्जीपणाच्या कारभारावर मजीप्राचे कार्यकारी अभियंता अजयसिंह आणि मनपाचे प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी व यंत्रनेतील कारभाऱ्यांनी ठेकेदाराच्या या अनियमितत्तेकडे व चुकीच्या कामांकडे दुर्लक्ष करत डोळेझाक केली आहे. त्याचा परिणाम म्हणजे मनपाने डिझेल जनरेटरवर चालणाऱ्या गृव्ह कटिंग मशीनने अथवा शक्य होईल तेवढ्या जागेत मनुष्यबळाचा वापर करून टिकावाने खोदकाम करण्याची परवानगी दिलेली असताना ठेकेदार चक्क जेसीबी लावून खोदकाम करत आहे. 

मनपाचा असा हा दुजाभाव

यापूर्वी मपनाने भारत गॅस रिसोर्स कंपनीला गॅस पाइपलाइन खोदण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र त्याने देखील शहरातील रस्ते, फुटपाथ, जलवाहिनी आणि इतर अत्यावश्यक नागरी सेवांची वाट लावल्याने मनपाने त्याला दिलेली परवानगी नाकारत खोदकामाचे दर वाढवले. यात कंपनीला रस्ते खोदकाम व दुरूस्ती शुल्कापोटी ३०० कोटीची मागणी मनपाने केली आहे. त्यामुळे गत चार महिन्यापासून औरंगाबादेत गॅस पाइपलाइनचे काम ठप्प झालेले आहे. इकडे जलवाहिनीचे काम मनपासाठीच असल्याने ठेकेदाराला निशुल्क खोदकामाचा परवाना दिलेला आहे. ज्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता असताना देखील मनपाच्या रस्ते बांधकाम विभागाने आजपर्यंत याची साधी चौकशी देखील केलेली नाही. योजनेला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देणारे, नियोजित विकास आराखडा मंजूर करणारे, बिले काढणारे सर्वच अभियंता यात दोषी असून ठेकेदारांला वेळोवेळो बिले अदा केली जात आहेत. मजीप्राचे मुख्य व अधीक्षक अभियंता तसेच मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी याकडे लक्ष घालून बेकायदा मनमानी कामे करणाऱ्या ठेकेदाराला धडा शिकवला पाहिजे, तसेच याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना लक्ष घालण्यासाठी सज्ज करावे, अशी औरंगाबादकरांची माफक अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com