छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जिल्हा प्रशासनामार्फत शहरातील नगरनाका ते गोलवाडी, हर्सुल टी पाॅईंट, बीड बायपास या रस्त्यांचे विस्तारीकरण करण्यात आल्याने छत्रपती संभाजीनगरकरांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र, महावीर चौक ते नगर नाका कोंडी कधी फुटेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने येथील वाहतूक कोंडी फोडणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या मार्गाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास होऊन त्याप्रमाणे वाहतुकीचे नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी पोलिस आयुक्त ,जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, आरटीओ व महानगरपालिका प्रशासकांनी त्या दिशेने खंबीरपणे पावले उचलणे आवश्यक आहे.
नुकत्यात झालेल्या गॅस गळती प्रकरणानंतर महानगरपालिका प्रशासकांनी शहरातील प्रमुख रस्त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी काही तज्ज्ञांची समिती नेमली आहे. त्यांनी तपासणीला सुरूवात देखील केली असून, यात महावीर चौक ते नगरनाका रस्त्याच्या विस्तारीकरणाबाबत ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
शहराचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी विकास आराखडा अंतिम करून अंमलबजावणी केल्याशिवाय पर्याय नाही. एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर डोळे उघडून उपाय शोधणे म्हणजे वरवरची मलमपट्टी ठरण्याची शक्यता अधिक आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात शहराच्या चारही बाजूंनी उभी राहणारी गृहसंकुले, आता डीएमआयसीतील ऑरिक सिटीत आयटी पार्कची घोषणा, मॉल आणि अन्य वास्तू उभ्या राहत असल्याने भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या आणखी जटील होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक गुंतागुंतीची होऊ नये म्हणून महापालिकेने आताच पावले उचलण्याची गरज आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा अहवाल मध्यंतरी प्रादेशिक परिवहन विभागाने जाहीर केला होता. शहरातील महत्त्वाचे रस्ते अरुंद असल्याने या कोंडीत भर पडत आहे. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी तत्कालीन महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व डाॅ. पुरूषोत्तम भापकर यांच्यानंतर फारसे कुणी धाडस दाखवले नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहर प्रचंड वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहरात कोट्यवधींचे सिमेंट व डांबरी रस्त्यांचे जाळे पसरले. मात्र सदोष बांधकामाचा मोठा फटका नागरिकांसह वाहतुकीला बसला आहे. सदर रस्ते कधी ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यासाठी तर कधी जलवाहिनी, मलनिःसारण वाहिनी, महावितरणची केबल तर कधी सीसीटीव्हीची तर कधी सिंग्नलची टाकण्यासाठी खोदले जातात. पण टेंडरच्या अटीशर्तीला फाटा देत कंत्राटदारांकडून रस्ते दुरूस्तीला ग्रहण लावले जाते. परिणामी यामार्गावरून प्रवास करणारी अवजड वाहने खड्ड्यांमध्ये अडकून पडल्याने त्यांच्या मागे वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या दिसतात. त्यामुळे शहरातील प्रत्येक मार्गांवर वाहतूक कासवगतीने सुरू आहे.
तसेच गत गुरूवारी सिडको उड्डाणपुलावर एलपीजी गॅसचा टँकर उलटल्याने या अपघातामुळे जालना रस्त्याची वाहतूक काही तास ठप्प झाली होती. यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. तसेच एकीकडे संपूर्ण शहरातील रस्त्यांवर फळभाजी विक्रेते, वाहन दुरूस्ती केंद्र, रसवंत्या व चहानाश्ता ठेल्यांनी व भंगार वाहनांनी अतिक्रमण केल्याने आणि रिक्षाचालकांची मुजोरी वाढल्याने आधीच अरूंद रस्ते छोटे झाल्याने मार्गांवरून जाणाऱ्या वाहनांचा ताण शहरावर वाढला आहे.
एखाद्या अप्रिय घटनेने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होताच त्याचे परिणाम शहरातील अंतर्गत रस्ते आणि गल्लीबोळात जाणवतात. शहरातील सेव्हनहील ते गजानन मंदिर चौक, ते सुतगिरणी चौक, गजानन मंदिर चौक ते जयभवानी नगर चौक ते कामगार चौक व सिडको टी पाॅईंट, गजानन मंदिर चौक ते त्रिमुर्ती चौक ते चेतक घोडा, जवाहरनगर पोलिस स्टेशन ते टिळकनगर, जालनारोड अमरप्रित ते शहानुरवाडी एकता चौक, पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा बीड बायपास सेव्हनहील ते जकात नाका ते टीव्ही सेंटर टीव्हीसेंटर ते हाॅटेल शरद टी पाॅईंट, हायकोर्ट ते मुकुंदवाडी चौक जोड रस्ता, सिडको टी पाॅइंट ते बसस्थानक ते एपीआय क्वार्नर वाहतूक कोंडीची जुनीच आगारे असल्याचे चित्र आहे.
वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ही समस्या अधिकाधिक बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगरपालिकेने आता शहरातील वाहतुकीचे नियोजन करताना भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे काही रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल आणि वाहनतळाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आणि सर्वच मार्गाचा सविस्तर शास्त्रीय अभ्यास करून त्याआधारे वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे.
शहरातील जालना रस्त्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आकाशवाणी, अमरप्रित सिग्नललगत रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड्स लाऊन बंद केल्याने विकास आराखड्यातील रस्त्यांचे नाक दाबले आहे. त्यात सिडको उड्डाणपुलाच्या धावपट्टीमुळे जालना रस्त्याचे गणितच बिघडले. अग्रसेन चौकातून थेट एन - ३ कडे जाणारा रस्ताच दुभाजक बांधून बंद केला गेला. सिडको टी पाॅईंट येथील हायकोर्ट कडून मुकुंदवाडी चौकाकडे जाणारा जोड रस्ता खंडित केला गेला. शहर वाहतूक शाखेने केलेल्या या बदलामुळे वाहतूक कोंडी अधिक वाढली. त्याचबरोबर चुकीच्या दिशेने जाणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने अपघाताची संख्या वाढली. त्यात बीड बायपास संग्रामनगर चौक उड्डाणपुलादरम्यान बीड बायपास पासून साताऱ्याकडे जाणाऱ्या आमदार रस्त्याचा लचका तोडल्याने सातारा वासियांची पंचाईत होऊन गैरसोयीत भर पाडली.
शहरातील जालना रस्त्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सिडको, सेव्हनहील, मोंढा नाका, क्रांतीचौक, महावीर चौक तसेच छत्रपती संभाजीनगर ते पैठण मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारण्यात आला. भडकल गेट ते रंगीन दरवाजा दरम्यान ज्युबली पार्क येथे उड्डाणपूल उभारण्यात आला. तसेच शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक - ५५ येथे भुयारी मार्गाचे काम देखील सुरू करण्यात आले. यामुळे बीड बायपास व संग्रामनगर उड्डाणपुलावर वाहतुकीचा ताण वाढला. मात्र वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने उड्डाणपूल उभारून देखील शहरात कोंडी कायम आहे.
त्यामुळे शहरातील वाहतुकीचा शास्त्रीय पद्धतीने सविस्तर अभ्यास करून त्यानुसार वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिस आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांनी पावले उचलणे गरजेचे आहे.