
औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न लक्षात घेऊन औरंगाबाद स्मार्ट सिटीने जल बेल ॲपची निर्मिती केली. या ॲपला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. एकूण 15000 पेक्षा अधिक नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. 450 नागरिकांनी ॲप बद्दल प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. (Aurangabad Smart City Jal Bell App)
औरंगाबाद स्मार्ट सिटीने १९ मे २०२२ रोजी शहरातील नागरिकांना पाणी वितरणाची माहिती देण्याकरिता जल बेल ॲपची सुरूवात केली. या ॲपमध्ये सुरवातीला ३० वॉर्डांचा समावेश होता. नागरिकांद्वारे केवळ ८ दिवसांमध्ये २५०० पेक्षा अधिक निवेदने प्राप्त झाली असून, इतरही भागांत ॲपची सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर सातत्याने या ॲपमध्ये क्रमाक्रमाने वॉर्ड समाविष्ट करण्यात आले. सध्या जवळपास १०० वॉर्ड या ॲप मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या ॲपद्वारे नागरिकांना एक दिवसापूर्वीच पाणी दिवसाची सूचना मिळते. त्यानंतर पाणी वेळेची अचूक सूचना उपलब्ध होते. तसेच पाणी वेळेत उशीर होणार असल्यास तशी पूर्वसूचना देखील देण्यात येते. जलवाहिनी दुरूस्ती, पाणी गळती सारख्या समस्यांची फोटो सहित माहिती नागरिकांना ॲपवर कळविण्यात येते.
जल बेल ॲपची आकडेवारी
● १५००० पेक्षा अधिक नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.
● ४५० पेक्षा अधिक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया प्ले स्टोअरवर मांडल्या आहेत.
● यात एकूण 5 पैकी 4.2 अशी श्रेणी जल बेल ॲपला मिळाली आहे.
● ॲपमध्ये १०० वॉर्ड मधील ९५० पेक्षा अधिक टप्पे समाविष्ट करण्यात आले आहेत.
● आतापर्यंत एकूण १२,००० पेक्षा अधिक पाणीवेळेच्या सूचना नागरिकांना या ॲपमार्फत देण्यात आल्या आहेत.
ॲपची अचूकता वाढविणार
शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी वितरणाची वेळ व समस्या वेगवेगळी आहे. जल बेल ॲपवर शहरातील नागरिकांना पाणीवेळेची सूचना अधिक लवकर कशी पाठवता येईल, यावर प्रयत्न करण्यात येत आहेत. ॲप मधील काही टप्प्यांच्या नावांमध्ये बदल समाविष्ट करण्यात येणार आहेत.
नवीन तांत्रिक वैशिष्ट्ये ॲपमध्ये समाविष्ट करून पाणीवेळेची अचूकता वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती औरंगाबाद स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली आणि जल बेल ॲपचे निर्माता निलेश लोणकर यांच्याकडून देण्यात आली आहे.