
औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेत स्मार्ट सिटीतून (Smart City) प्रकल्पांतर्गत ८८ कोटीतून २२ रस्त्यांची कामे सुरू आहेत. सुरवातीपासूनच 'टेंडरनामा' या स्मार्ट रस्त्यांच्या निकृष्ट कामांवर वाचा फोडली. या रस्त्यांसाठी नेमलेल्या मुंबईच्या आयआयटीच्या (IIT Mumbai) तांत्रिक समितीने देखील त्याला दुजोरो देत काम आयआरसीच्या नियमांना बगल देत निकृष्टपणे होत असल्याचा ठपका ठेवला आहे.
अद्याप मनपा प्रशासकांना या निकृष्ट स्मार्ट रस्त्यांची पाहणी करायला वेळ मिळत नाही. दुसरीकडे खराब झालेले रस्ते दुरुस्त करून घेऊ, असे म्हणत उपमुख्याधिकारी कंत्राटदारावर गांधीगिरी दाखवत मेहरबानी करत आहेत. दरम्यान 'टेंडरनामा' वृत्तमालिकेची दखल घेत भाजपच्या एका शिष्टमंडळाने थेट या रस्त्यांचा दर्जा तपासण्याची मागणी ताजी आहे. आता पुन्हा 'टेंडरनामा'ने टाऊन हाॅल ते मकाई गेट या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होत असलेल्या निकृष्ट कामाचा भांडाफोड करताच आधी खडी अंथरून काम सुरू करणाऱ्या कंत्राटदार ए. जी. कन्सट्रक्शनचे अस्लम राजस्थानी यांनी वृत्त प्रकाशित होताच, खडी उचलून रस्ता दीड ते दोन फुटापर्यंत खोदकाम करून तयार करण्याचा निर्णय घेतला आणि आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
माजी नगरसेवकाने उपस्थित केला प्रश्न
या धक्कादायक प्रकारानंतर माजी नगरसेवक गंगाधर ढगे यांनी या रस्त्याच्या चौकशीची मागणी केली आहे. आधी जुन्या रस्त्यावरून खडी टाकून हा रस्ता बनविण्याचा प्रयत्न झाला. आता खडी उचलून खोदकाम करून हा नवीन रस्ता तयार केला जात आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात नेमकी काय तरतूद आहे, कंत्राटदाराने पैसे वाचविण्यासाठी आधी खोदकाम न करताच खडी टाकून थेट ड्रायलीन काॅंक्रिट आणि पॅव्हमेंट क्वालिटी काॅक्रिटचे थरावर थर टाकण्याचा प्रयत्न केला काय, असे मुद्दे उपस्थित करत त्यांनी चौकशीची मागणी मनपा प्रशासकांकडे केली आहे.
गत अनेक वर्षांपासून रखडलेल्या टाऊन हाॅल ते मकाई गेट या जागतिक पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या मुख्य खड्डेमय रस्त्याच्या दुरवस्थेवर 'टेंडरनामा'ने वाचा फोडली. त्याची दखल घेत तत्कालीन मनपा प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तीककुमार पांण्डेय यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या रस्त्याचा समावेश केला.यासाठी जवळपास अडीच कोटीचा निधी मंजूर केला. कंत्राटदाराने महिन्याभरापूर्वी या रस्त्याचे काम सुरू केले होते. मात्र सुरूवातीला अस्तित्वातील जुन्या रस्त्यावरच जेसीबीच्या दात्याने स्कॅरिफ्राय करून रस्ता ओरबाडून त्यावरच खडी टाकून काम करण्याचा प्रताप केला.
पसरलेल्या खडीने औरंगाबादकरांच्या त्रासात भर
गेल्या अनेक दिवसापासून खडी तशीच ठेवल्याने औरंगाबादकरांसह देशी - विदेशी पर्यटक तसेच विद्यापीठाकडे जाणारे विद्यार्थी, प्राध्यापक, घाटीतील रुग्ण, तसेच डाॅक्टर व कर्मचारी, रस्त्यालगत राहणारे नागरिक खडी आणि धुळीने त्रस्त झाले होते. त्यात रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर मनपा कारभाऱ्यांना ड्रेनेजलाईन आणि पाईपलाईन टाकण्याचे उशिरा शहाणपण सूचल्याने काम पून्हा रेंगाळले. येथील अंगठेफोड समंस्यावर नागरिकांनी 'टेंडरनामा'कडे कैफियत मांडली. प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात पसरलेल्या खडीवरून वाहनधारकांना कसा घसरगुंडीचा त्रास होतो याचा स्वतः अनुभव घेतला. यात येथील निकृष्ट कामाचे गौडबंगाल दोन तीन दिवसापूर्वीच 'टेंडरनामा'ने उघड केले होते.
वृत्त प्रकाशित होताच कंत्राटदाराने खडी उचलून घेतली आणि जुना रस्ता खाली दीड ते दोन फुटापर्यंत खोदकामास सुरूवात केली. त्यामुळे या रस्त्याच्या टेंडरमधील मुळ अंदाजपत्रकात नेमकी काय तरतूद होती, असा सवाल येथील नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. आधी जुन्या रस्त्यावर खडी टाकली अन् आता खोदकाम चालू केल्याने कामात विलंब होत असल्याने नागरिकांच्या त्रासात मात्र भर पडत आहे.
या प्रकरणात एकीकडे माजी नगरसेवक गंगाधर ढगे यांनी कंत्राटदाराने आधी टाकलेली खडी उचलून आता खोदकाम का सुरू केले आहे, यामागचे नेमके गौडबंगाल काय याची चौकशीची मागणी करत आहेत. मात्र दुसरीकडे याच भागातील दुसरे माजी नगरसेवक अबुल हाश्मी यांनी रस्त्यालगत एका धार्मिक स्थळात पणी जाऊ नये, म्हणून प्रशासकांना खोदकाम करून रस्ता तयार करायची मागणी केली होती. त्याचबरोबर या भागात १९९५ पूर्वीची ड्रेनेजलाइन आहे. एकदा रस्ता झाल्यावर पून्हा खोदकाम होऊ नये, यासाठी ड्रेनेजलाईन व पाईपलाईप टाकण्याची विनंती केल्याने प्रशासकांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत काम सुरू केल्याचा दावा त्यांनी केला आहे.