कोट्यवधी खर्च करून बांधला सिमेंट रस्ता; पण 'हा' नाल्यावरील पूल का बनलाय मृत्यूचा सापळा?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरातील फुलेनगर रेल्वे फाटक ते एमआयटी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २११ ला जोडणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम झाले.‌ या कामावर कोट्यवधी रुपये उधळले. मात्र या रस्त्याच्या नाल्यावरील दोन मोठे जीर्ण झालेले नळकांडी पूल आहेत. यातील एका पुलाला तोडून न बांधता त्यावरच सिमेंट रस्ता बनविण्यात आला आहे. तर दुसऱ्या पुलाचे काम गत सहा महिन्यांपासून रखडले आहे.

Sambhajinagar
Gadachiroli : जिल्ह्यातील सव्वादोन लाख मजुरांमध्ये असंतोष; 32 कोटी रुपयांची मजुरी का थकली?

विशेषतः गत दहा वर्षांत पावसाळ्यात याच पुलांवर पावसाचे पाणी चढल्याने १२ लोकांना जलसमाधी मिळाल्याची मोठी घटना घडली आहे. नाल्यावरील कमी उंचीच्या व जीर्ण झालेल्या  या जीवघेण्या पुलांची अवस्था बिकट असताना स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी नळकांडी पुलांची उंची न वाढवता तसेच सिमेंटचे पूल न बांधता थेट एका पुलावरच सिमेंट रस्त्याचा भार टाकण्यात आला आहे.‌ तर दुसऱ्या पुलासाठी नाल्यात मोठमोठे पाइप आणून टाकले आहेत. मात्र त्याचे काम गत सहा महिन्यांपासून रखडले आहे.‌

याशिवाय सिमेंट रस्त्याचे कामही रखडल्याने नागरिकांना खिंडारातून मार्गक्रमण करावे लागत आहे.‌ पुलांची उंची न वाढवता, त्याच पुलांवर सिमेंट रस्ता तयार केल्याने पावसाळ्यात पूल खचून रस्ता दुभंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.‌ शिवाय दर पावसाळ्यात पुलांवर पाणी चढून रस्त्याचा वापर करता येणार नाही, असे या भागातील नागरिकांनी 'टेंडरनामा'शी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे नाल्यावरील पुलांवर संरक्षण कठडे ही लावण्यात आले नाही. तूटलेल्या पुलांवरच सिमेंट रस्त्याचे काम उरकण्यात आले आहे. या पुलांवरून वाहने जाताना पूल हादरून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

Sambhajinagar
'ग्रामविकास'चा निर्णय; मार्च अखेरची बिले ऑफलाईन मंजुरीसाठी जिल्हा परिषदांना 12 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

नाल्यावरील अरुंद व जीर्णावस्थेतील पुलांच्या बांधकामासाठी एमआयटी प्रशासन, सातारा परिसरातील नागरिक मागील दहा वर्षांपासून मागणी करत आहेत. परंतु काही महिन्यांपूर्वी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून येथे सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. दरम्यान अंदाजपत्रकात पुलांच्या बांधकामाचा समावेश करण्यात आला नाही.‌ सध्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याने घोडे कुठे अडले, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

जीर्ण झालेल्या पुलांचे पाइप काढून तेथे कॉलम उभे करून सिमेंटचे पूल बांधणे अपेक्षित होते. पुलांची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते.‌ परंतु आहे, त्याच जुन्या पुलांवर सिमेंट रस्ता तयार करण्यात आला आहे. परिणामी नागरिकांना पावसाळ्यात नेहमीचाच त्रास सोसावा लागणार आहे.

यापूर्वी "टेंडरनामा"ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत तत्कालीन महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पुलांच्या बांधकामासाठी दहा कोटीचा निधी मंजूर केला असताना ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आता पुलांचे बांधकाम करावयाचे ठरल्यास सिमेंट रस्ता फोडावा लागेल. यात अधिकाऱ्यांच्या बेफिकिर कारभारामुळे जनतेच्या पैशाचाच चुराडा होणार आहे. नाल्यावरील अरुंद व कमी उंचीच्या पुलांमुळे बारा जणांचे बळी गेले होते. तेव्हापासून या पुलांच्या बांधकामासाठी मागणी होत आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी लवकरच महानगरपालिकेने याची दखल घ्यावी, अशी मागणी लोकांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com