Eknath Shinde
Eknath Shinde Tendernama
टेंडर न्यूज

मुख्यमंत्री शिंदे मुकुंदनगरवासीयांना पावणार का? झोपलेली पालिका...

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी परिसरातील राजनगर,  मुकुंदनगर व अन्य शेकडो वसाहतींना अविकसित झोन मधून विकसित झोनमध्ये टाका, परिसरात तातडीने पोलिस चौकीची व्यवस्था करा, पक्के रस्ते, पथदिवे आणि जलवाहिनीसह आरोग्य केंद्र, महापालिकेची शाळा आदी मूलभूत सुविधा देण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन येथील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

औरंगाबाद महापालिका हद्दीतील मौजे मुकुंदवाडी भागातील राजनगर, मुकुंदनगर व अन्य शेकडो वसाहतींमधील जमिनींचे नगर भूमापन कार्यालयामार्फत येथील जमिनींचे गटातून सर्व्हेमध्ये रुपांतर झाले नाही. गत चाळीस वर्षांत महापालिकेने या वसाहतींकडे ढूंकूनही पाहिले नाही. लोकांनी नैसर्गिक नाले दाबल्यामूळे थेट बायपासकडून उतारावरून येणारे पाणी वसाहतीकडे शिरते. अद्याप मलःनिसारण वाहिन्या, जलवाहिन्या, पक्के रस्ते आणि आरोग्य सुविधा, पथदिवे नाहीत. यासंदर्भात महापालिकेकडे वेळोवेळी निवेदने, आंदोलने करूनही सुविधा देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत येथील रहिवाशांनी सोमवारी चिकलठाणा विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेराव घालत सुविधा देण्याची विनंती केली.

यावेळी निवेदन हातात पडताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कथित भागातील पाहणी करून तेथील सेवा-सुविधांसदर्भात आपल्याला काय करता येईल, याचा सविस्तर पाहणी अहवाल पाठवण्याचे रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांना सांगितले. यावर भूमरे यांनी लगेच होकार देत याभागातील रस्ते करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. 

यावेळी नागरिकांनी बाळापूर गेट क्रमांक ५६ ते बीडबायपासकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य तयार होते. पुढे वसाहतीतून बाहेर पडताना रेल्वेगेटचा मोठा अडसर होतो. यासाठी भूयारी मार्ग आणि रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे, अशा मागण्या केल्या. त्याची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी एका निवेदनावर महापालिका प्रशासकांना देखील काही सूचना लिहिल्या.

सदर निवेदन तातडीने प्रशासकांकडे देखील द्या अशी सूचना देखील त्यांनी नागरिकांना केली. यासंदर्भात महापालिका आणि आमदार भूमरेंकडून आढावा घेण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. शिंदेच्या आश्वासनानंतर त्याच दिवशी दुपारी नागरिकांनी महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांची भेट घेत निवेदनाची प्रत सादर केली.