Santosh Bangar
Santosh Bangar Tendernama
टेंडर न्यूज

कंत्राटदारावर का भडकले शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर; थेट कानशिलात

टेंडरनामा ब्युरो

हिंगोली (Hingoli) : शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे सातत्याने चर्चेत असतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर सुरवातीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असलेले बांगर हे एका रात्रीत शिंदेंना जाऊन मिळाले आणि पुन्हा चर्चेत आले. शिवसेना कधीही सोडणार नाही, असे म्हणणारे बांगर अवघ्या काही तासांत शिंदे गटात सामील झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. आमदार बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र या वेळी कारण वेगळे आहे. एका कंत्राटदारावर बांगर चांगलेच भडकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मध्यान भोजन योजनेतून कामगारांना दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आल्याचे दिसताच बांगर यांचा पारा कमालीचा चढला. त्यावरून बांगर यांनी संबंधित उपहार गृहाचा कंत्राटदार आणि व्यवस्थापकाला चांगलेच सुनावले. हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा येथील एका उपहारगृहाची पाहणी करायला गेलेल्या आमदार बांगर यांचा भोजनाच्या निकृष्ट दर्जामुळे पारा चांगलाच चढला. संतप्त झालेल्या आमदारांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावल्याचे व्हिडिओतून दिसते आहे.

सरकारतर्फे नोंदणीकृत आणि विना नोंदणीकृत कामगारांना मध्यान्ह भोजन दिले जाते. परंतु, हे मध्यान्ह भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचे आमदार संतोष बांगर यांना दिसून आले. जेवणाचा निकृष्ट दर्जा आणि शासनाने ठरवून दिलेल्या मेन्यू प्रमाणे जेवण न दिल्यामुळे आमदार बांगर यांनी जाब विचारत व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. निकृष्ट दर्जाचे मध्यानभोजन कामगारांना देत असल्यामुळे आमदार बांगर चांगलेच आक्रमक झाले होते.

खासगी कंत्राटदाराकडे कामगारांना मध्यान भोजन पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित कंत्राटदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि शासनाने ठरवून दिलेल्या मेन्यूचा कोणताही अवलंब न करता जेवण पुरवले जात होते. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा अशी मागणी आमदार बांगर यांनी केली आहे. या प्रकरणामुळे बंडखोर शिवसेना आमदार संतोष बांगर पुन्हा चर्चेत आले आहेत.