Eknath Shinde
Eknath Shinde Tendernama
टेंडर न्यूज

मुख्यमंत्री विदर्भावर का झाले प्रसन्न? 44 हजार कोटी;45 हजार रोजगार

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : विदर्भ (Vidarbha) मजबूत, तर राज्य मजबूत, अशी सरकारची भावना आहे. विदर्भाच्या संपूर्ण विकासाशिवाय महाराष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही. देशासाठी महाराष्ट्र जसा महत्त्वाचा तसा महाराष्ट्रासाठी विदर्भ महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने सरकार नागपूरपासून विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा 'इकॉनॉमिक कॉरिडॉर' शक्तीपीठ महामार्ग विकसित करणार आहे. नागपूर हे शहर 'लॉजिस्टिक हब' म्हणून पुढे येणार आहे. नागपूर, वर्धा या ठिकाणी पुढील काळात मोठ्या प्रमाणात 'लॉजिस्टिक सपोर्ट' तयार होणार आहे. तसेच विदर्भ, मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता दिली आहे. त्यापैकी विदर्भामध्ये ४४ हजार कोटींची गुंतवणूक आणि ४५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत केली.

विदर्भाच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास पूर्ण होऊ शकत नाही, असे सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा विधानसभेत केली. कृषी, जलसंपदा, उद्योग, वस्त्रोद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्रात विदर्भासाठी भरीव तरतूद करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
विधानसभेत २९३ अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना शिंदे यांनी विदर्भासाठी पर्यटन सर्किट, नवीन खनिज धोरण, समतोल प्रादेशिक विकासासाठी नवीन समिती अशा विविध घोषणा केल्या. विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाकडून सदस्यांनी मांडलेले मुद्दे आणि सूचनांच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रनिहाय विदर्भाचा कसा विकास करण्यात येईल ते सांगितले.
गडचिरोलीचा पालकमंत्री म्हणून काम पाहिल्याने विदर्भाच्या अनेक प्रश्नांचा जवळून अभ्यास केला आहे. विदर्भाचे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. १९५३ मध्ये नागपूर करार झाला आणि दरवर्षी नागपूरला एक अधिवेशन होईल असे ठरले. या करारावर यशवंतराव चव्हाण, बॅ. एस. के. वानखेडे, पी. के. देशमुख, भाऊसाहेब हिरे, देवकीनंदन, लक्ष्मणराव भाटकर, रामराव देशमुख, गोपाळराव खेडकर, नानासाहेब कुंटे अशा दिग्गजांच्या सह्या आहेत. केवळ नागपूर शहराला नाही तर संपूर्ण विदर्भाला एक दिलासा मिळावा, येथील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, त्यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी हे अधिवेशन भरविण्याचे ठरले. हवापालट करण्यासाठी हे अधिवेशन होत नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

विदर्भाच्या प्रश्नांवर सत्ताधारी असोत किंवा विरोधक, आपण एकत्र येऊन त्यावर ठोस आणि कालबद्ध पावले टाकू असे सांगून शिंदे म्हणाले, कोविड परिस्थितीमुळे दोन वर्षानंतर हे अधिवेशन होते आहे. नागपूर ही केवळ राज्याची उपराजधानी नाही तर राज्याच्या प्रगती आणि विकासात खूप महत्वाचे योगदान देणारा जिल्हा म्हणून नागपूरची नवी ओळख निर्माण झाली आहे. आमच्या युती सरकारला सहा महिने पूर्ण होताहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणून मलाही विदर्भासाठी काहीतरी भरीव करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे.
विदर्भ मजबूत, तर राज्य मजबूत, अशी आमची भावना आहे.  विदर्भाच्या संपूर्ण विकासाशिवाय महाराष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही. देशासाठी महाराष्ट्र जसा महत्त्वाचा तसा महाराष्ट्रासाठी विदर्भ महत्त्वाचा आहे. म्हणूनच आम्ही गेल्या सहा महिन्यात विविध निर्णय घेताना विदर्भ, मराठवाड्यासारख्या तुलनेने अविकसित प्रदेशाचा विकास हा केंद्रस्थानी मानला आहे. अर्थातच उपराजधानी नागपूरला राजधानी मुंबईशी जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सुरु करून आम्ही उद्याच्या उज्वल भवितव्याचा महामार्ग खुला केला आहे, असे शिंदे यांनी सांगितले
महाराष्ट्राने विदर्भाचा नेहमीच सन्मान केला आहे. विदर्भाच्या भूमीभोवती आर्थिक अनुशेषाची आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येच्या दुःखाची काळी किनार आहे. तरीही या परिसरात आत्मविश्वास आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. विदर्भाविषयी आमच्या सरकारमध्ये अपार आदराची भावना आहे. विदर्भाला न्याय दिला पाहिजे. त्यामुळे विदर्भाचा विकास हे आमच्या सरकारचे परम कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडणारच, असा निर्धार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

विदर्भासाठी महत्वाचे निर्णय -

• विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्र सरकारला विनंती

• नागपूरपासून विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा 'इकॉनॉमिक कॉरिडॉर' शक्तीपीठ महामार्ग विकसित करणार. यामुळे मराठवाडा देखील जोडला जाईल तसेच दक्षिण भारत थेट मध्य महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे.

• नागपूर हे शहर 'लॉजिस्टिक हब ' म्हणून पुढे येणार आहे. नागपूर, वर्धा या ठिकाणी पुढील काळात मोठ्या प्रमाणात 'लॉजिस्टिक सपोर्ट' तयार होणार आहे.

• विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना.  ७० हजार कोटीच्या  रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता. त्यापैकी विदर्भामध्ये एकूण ४४ हजार १२३ कोटी रुपयांची गुंतवणूक. ४५ हजार रोजगार निर्मिती होणार

मुख्यमंत्र्यांची बळीराजाला साद
एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात बळीराजा साद घालताना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. एकजरी आत्महत्या झाली, तरी त्याचे दुःख आहे. शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी देखील विविध योजना, कालबद्ध अंमलबजावणी करून कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनला अधिक मजबूत करण्यात येईल आणि त्यांच्या माध्यमातून या आत्महत्या कमी कशा होतील, याचा प्रयत्न करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून त्यांच्याशी संवाद साधणे, समुपदेशन करणे यासाठी समाजातील तज्ज्ञांना देखील सहभागी करून घेण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.

'आज बळीराजाला इतकच सांगणं आहे, खचू नको तू बळीराजा, धरू एकमेकांचे हात रे, आली संकटे कितीही त्यावर, सोबत करू मात रे', अशी सादही शिंदे यांनी घातली.