Water Sport Tendernama
टेंडर न्यूज

Tender : महाराष्ट्रातील 'या' मोठ्या धरणात सुरू होणार जलपर्यटन

Solapur : उजनी धरण परिसरात जल पर्यटनासंदर्भात कामास गती मिळाली असून विविध टेंडर प्रसिद्ध झाल्या आहेत.

टेंडरनामा ब्युरो

भीमानगर (Bhimanagar) : उजनी धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलसाठा असणारे धरण आहे. येथे भव्य जलपर्यटन केंद्र विकसित व्हावे, अशी भूमिका आमदार नारायण पाटील व आमदार अभिजित पाटील यांनी मांडली.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या बहुचर्चित उजनी जलपर्यटन आराखड्यासंदर्भात भीमानगर (ता. माढा) येथील शासकीय विश्रामगृहात दोन्ही आमदार, जलसंपदा विभागाचे अधिकारी व नागरिक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

उजनी जलाशयात स्पीड बोट, हाऊस बोट, रेस्टॉरंट, कृषी पर्यटन, पर्यटकांसाठी राहण्याची व्यवस्था आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी जलसंपदा अधिकाऱ्यांनी 'स्लाइड शो'च्या माध्यमातून प्रस्तावित प्रकल्प दाखविला. उजनी धरण परिसरात जल पर्यटनासंदर्भात कामास गती मिळाली असून विविध टेंडर प्रसिद्ध झाल्या आहेत.

बैठकीदरम्यान आमदार अभिजित पाटील व आमदार नारायण पाटील यांनी जलपर्यटन प्रकल्प पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध संकल्पना मांडून उपलब्ध करावयाच्या सोयी-सुविधांबद्दल अधिकारी व नागरिकांची मते जाणून घेतली.

याप्रसंगी जलसंपदाचे अधीक्षक अभियंता श्री. खांडेकर, उजनी धरण मुख्य कार्यकारी अभियंता रा. पो. मोरे, उपविभागीय अधिकारी श्री. खडतरे, राष्ट्रवादीचे संजय कोकाटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत शिंदे, लेबर फेडरेशन माजी अध्यक्ष भारत पाटील, माजी सरपंच प्रमोद कुटे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, कृषिनिष्ठ परिवाराचे अध्यक्ष नितीन कापसे, डीव्हीपी बँकेचे अध्यक्ष भाऊसाहेब महाडिक, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष आदित्य जाधव, सुरेश पाटील, प्रकाश चोपडे आदी उपस्थित होते.

स्व. चव्हाण यांचे स्मारक बांधण्याची मागणी

माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १९६५ साली उजनी धरणाचे भूमिपूजन झाले. स्व. चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे कायमस्वरूपी दुष्काळी असणारा सोलापूर जिल्हा सुजलाम्‌ सुफलाम्‌ झाला. त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना उजाळा देण्यासाठी उजनी धरण परिसरात स्व. यशवंतराव चव्हाण यांचे पूर्णाकृती स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष आदित्य जाधव केली.

स्मारकासंदर्भात जलपर्यटन आराखड्यामध्ये समाविष्ट करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदार अभिजित पाटील व नारायण पाटील यांनी यावेळी दिली.