Uday Samant
Uday Samant Tendernama
टेंडर न्यूज

Uday Samant : उद्योगमंत्री उदय सामंतांनी केला 80 कोटींचा डांबर घोटाळा? कोणी केला आरोप?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी रत्नागिरीत तब्बल 80 कोटींचा 'डांबर घोटाळा' केल्याचा आरोप केला जात आहे. 'मे. आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन प्रा. लि.' कंपनीच्या माध्यमातून वडील आणि भावाच्या संगनमताने खोटी बिले बनवून 'एमआयडीसी', 'पीडब्लूडी' आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामात हा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला.

या पत्रकार परिषदेला अशोक नाचणकर उपस्थित होते. उदय सामंत गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरीतील शासकीय कामांत अनेक कंत्राटे मिळवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप यावेळी कीर यांनी केला. शासकीय कामे मर्जीतील ठेकेदारांना देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा भ्रष्टाचार सुरू आहे.

विशेष म्हणजे, वर्षानुवर्षे मर्जीतील आणि ठराविक ठेकेदारांनाच कंत्राटे मिळत आहेत. यासाठी ठराविक कंत्राटदारांची रिंग करून नव्या कंत्राटदारांना दमदाटी करून दबाव आणला जात आहे आणि मर्जीतील ठेकेदारांना काम देऊन भ्रष्टाचार, दर्जाहीन कामे केली जात असल्याचेही यावेळी कीर म्हणाले. या भ्रष्टाचाराबद्दल मंत्री उदय सामंत आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

टेंडरमधील अटी-शर्तीनुसार जेव्हा अभियंता डांबराचा वापर दाखवतो त्याच वेळी ठेकेदाराने दिलेल्या मूळ बिलावर क्रॉस करून, कार्यालयाचा सही-शिक्का मारून त्याची झेरॉक्स ठेकेदाराला परत द्यायची असते. मात्र ठेकेदाराला मूळ बिले क्रॉस न करता आणि सही-शिक्का न मारता देण्यात आली.

ठेकेदाराने याच बिलांचा गैरवापर दुसऱ्या कामांसाठी करून कोट्यवधी रुपये हडपले. यामध्ये एकाच बिलाची रक्कम अनेक वेळा घेतली गेली आणि ठेकेदाराने आयकरही बुडवला आहे, असा आरोपही कीर यांनी केला आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करून पुरावेही सादर केल्याचे यावेळी कीर म्हणाले. त्यामुळे या सर्व प्रकरणांची तातडीने सखोल चौकशी करावी आणि उदय सामंत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.