Mumbai Pune Expressway
Mumbai Pune Expressway Tendernama
टेंडर न्यूज

भन्नाट कल्पना! मुंबई-पुणे द्रुतगतीवर आता गाड्या करणार ब्लॅक लिस्ट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी राज्य परिवहन विभागाने एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लेन कटिंग करणाऱ्या व अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनांना दंड तर होईल, शिवाय त्यांना काही वेळेपुरते ब्लॅक लिस्ट म्हणजेच एक-दोन तासांसाठी ते वाहन थांबवून ठेवण्यात येईल. यासाठी टोल नाक्यावर विशेष प्रणाली विकसित केली जात आहे. वेळेच्या बचतीसाठी वाढविलेला वेगच वाहनांना ब्रेक लावण्यासाठी कारणीभूत ठरेल.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी राज्य परिवहन विभागाने सहा महिन्यांसाठी रस्ता सुरक्षा मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, या मोहिमेला आता पाच महिने पूर्ण झाले असून, यादरम्यान सर्वाधिक ओव्हरस्पिडिंगची प्रकरणे पुढे आली आहेत. एकूण १३ प्रकारच्या गुन्ह्यांत कारवाई करताना ओव्हरस्पिडिंग करणाऱ्या ६९८३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून १ कोटी ३९ लाख ६६ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे.

परिवहन विभागाने १ डिसेंबरपासून मोहीम सुरू केली होती. दरम्यान, नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल नाक्यांवर समुपदेशन करण्यात येत आहे. त्यांच्यावर कारवाई करून त्यांना दंडसुद्धा दिला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीच्या शिस्तीचे दर्शन दिसून आले. मात्र त्यानंतर आता पुन्हा काही वाहनचालकांमुळे द्रुतगती महामार्गावर बेशिस्त वाहतूक दिसून येत आहे. यामध्ये बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे परिवहन विभागाच्या कारवाईच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे.

परिवहनने राबविलेल्‍या मोहिमेत गेल्या पाच महिन्यांत एकूण ४०९०९ प्रकरणे समोर आली आहेत. यातून ७ कोटी २७ लाख रुपयांची दंडवसुली महसूल परिवहन विभागाने प्राप्त केली आहे.

- भरत कळसकर, उपपरिवहन आयुक्त, रस्ता सुरक्षा विभाग

महिन्‍यानुसार कारवाई

महिना प्रकरणे दंड

डिसेंबर ३७९० ६८ लाख ११ हजार

जानेवारी १०९३८ १ कोटी ६५ लाख ७९ हजार

फेब्रुवारी ८०१७ १ कोटी ४६ लाख ५४ हजार

मार्च १०१५८ १ कोटी ७७ लाख १६ हजार

एप्रिल ८००६ १ कोटी २० लाख असे

एकूण ४०९०९ ७ कोटी २७ लाख

प्रकरण निहाय केसेस दाखल

ओव्हरस्पिडिंग ६९८३

लेन कटिंग ६४४१

विना सिटबेल्ट ६०१२

चुकीच्या दिशेने पार्किंग ३१९४

मोबाईल फोन वापर ६५६

विना फिटनेस १२२६

विना लायसन्स १४५१

वाहनाचा विमा नसणे १४३६

वाहन क्रमांक न दिसणे १०६९

विना परमीट ३६४

प्रवासी बसमध्ये सामान वाहतूक ३४४

इतर ११५६९