Eknath Shinde Devendra Fadnavis Tendernama
टेंडर न्यूज

'स्थगिती'चा दणका; ठाकरेंना झटका, मात्र ग्रामीण महाराष्ट्राला फटका

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : Eknath Shinde एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे (Thackeray) यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी (MVA) सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द केले आहेत. काही निर्णयांना स्थगिती दिली आहे. शिंदे सरकारने बुधवारी आणखी एक मोठा निर्णय घेत ठाकरे सरकारच्या काळातील ग्रामीण भागातील विकासकामांना ब्रेक दिला आहे. गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या ज्या कामांना कार्यारंभ आदेश दिलेले नाहीत किंवा कार्यारंभ आदेश देऊनही जी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, अशी १ एप्रिल २०२१ पासूनची सर्व कामे स्थगित करण्यात आली आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या सरकारने यापूर्वी सुद्धा १ एप्रिल २०२१ पासूनच्या विविध विकासकामांना स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ज्या कामांची टेंडर निघालेली नाहीत, मात्र ती कामे मंजूर झाली आहेत, त्यांना स्थगिती दिली होती. जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येणाऱ्या सर्व कामांना देखील स्थगिती देण्यात आली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीद्वारे प्रस्तावित सर्व कामांना स्थगिती देण्यात आली आहे. 

आता तर महाविकास आघाडीच्या काळात लोकप्रतिनिधींनी सूचवलेल्या ग्रामीण भागातील विकासकामांनाही स्थगिती देण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून २५/१५ या योजनेतून गावांतर्गत मुलभूत सुविधांची विविध विकासकामे करता येतात. स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत आपल्या मतदारसंघात अशी कामे सूचवली जातात.

गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या ज्या कामांना अद्याप कार्यारंभ आदेश दिलेले नाहीत किंवा कार्यारंभ आदेश देऊनही जी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, अशी १ एप्रिल २०२१ पासूनची सर्व कामे स्थगित करण्यात आली आहेत. ग्रामविकास विभागाने १२ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील स्थगिती आदेश जारी केला आहे.