Solapur Municipal Corporation Tendernama
टेंडर न्यूज

Solapur : सोलापुरातील E-Bus चार्जिंग स्टेशनचे काम का रखडले?

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : केंद्र शासनाच्या योजनेतून सोलापूरसाठी १०० ई-बस मंजूर आहेत. त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी बुधवार पेठेतील जागेवर महावितरणकडून तांत्रिक कामे केली जाणार आहे. परंतु महापालिकेने जागाच ताब्यात दिली नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हे काम रखडले आहे.

महापालिकेला जागा मोफत देता येणार नसल्याने परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून ही जागा महातिवरणला हस्तांतर करण्यात येणार आहे. येत्या आठवड्याभरात जागेचा विषय मार्गी लागणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या दहा वर्षांपासून परिवहन विभागाला उतरती कळा लागली आहे. दरम्यान स्मार्ट सिटी, ई-बस योजना अशा विविध योजनांतर्गत नव्या बससाठी पाठविण्यात आलेले प्रस्ताव रद्द झाले. शहराची गरज ओळखून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र शासनाच्या आपली बस योजनांतर्गत १०० ई-बस मंजूर झाल्या आहेत.

या मंजुरीला आठ महिने पूर्ण झाले. तरी चार्जिंग स्टेशन उभारणीच्या कामाला अद्याप सुरवात झाली नाही. महापालिकेने सव्वादोन कोटी रुपयांचे टेंडर काढून या ठिकाणच्या बांधकामाचे काम पूर्ण केले. मात्र महत्त्वाचे काम हे महावितरण विभागाकडून होणार आहे.

महावितरण विभागाने तीन महिन्यापूर्वी नऊ कोटींच्या कामाचे टेंडर काढले होते. जागा ताब्यात आली नसल्याने अद्याप मक्तेदाराला कामाचा आदेश दिला नाही. महापालिकेने जागेची भाडे आकारणी केली होती. मात्र महावितरणने हे भाडे नाकारल्याने काम प्रलंबित राहिले. यातून मार्ग काढण्यासाठी परिवहन उपक्रमाकडून ही जागा महावितरणला विनामूल्य हस्तांतर करणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिकेकडून महावितरणला अद्याप जागा हस्तांतरित झाली नसल्याचे काम रखडले आहे. याबाबत संयुक्त बैठक होऊन त्यांनी विनामूल्य जागा देण्याबाबत प्रस्ताव मांडला आहे. परिवहन उपक्रमाची जागा असल्याने त्या विभागामार्फत जागा विनामूल्य देण्याची प्रक्रिया या आठवड्याभरात पूर्ण केली जाणार आहे.

- आशिष लोकरे, उपायुक्त