नाशिक (Nashik): नाशिकमधील वाहनधारकांना समृद्धी महामार्गाला थेट रस्त्याने जोडण्याची आवश्यकता नसल्याचे विधानपरिषदेत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आमदार सत्यजित तांबे यांना मागील आठवड्यात उत्तर दिले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने नाशिकच्या वाहनधारकांना थेट समृद्धीला जोडण्यासाठी सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे इंटरचेंज उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
दरम्यान या इंटरचेंजबाबत समृद्धी महामार्गाचे म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कोणत्या अधिकारात समृद्धी महामार्गावर इंटरचेंज उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करीत आहेत, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
समृद्धी महामार्गावरून नाशिकला येण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गोंदे व इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो हे दोन इंटरचेंज आहेत. दोन्हींचे अंतर नाशिकहून ४० किलोमीटरपेक्षा अधिक आहे. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि नागपूर येथून समृद्धी महामार्गाने येणाऱ्या भाविकांची वाहने नाशिकला येण्यासाठी थेट रस्ता असावा, यासाठी सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे इंटरचेंज सुविधा निर्माण करण्याच्या हालचाली सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, याबाबत प्राथमिक स्तरावर ही चर्चा सुरू आहे. शिवडे येथे इंटरचेंज प्रत्यक्षात साकारल्यास सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील गोंदे नंतरचा हा दुसरा इंटरचेंज ठरणार आहे. नाशिककरांनाही तो सर्वात जवळचा इंटरचेंज ठरू शकतो, त्यामुळे प्रवासाच्या वेळेत १५ किलोमीटरची बचत होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिवडे येथे भेट देऊन पाहणी केली आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नाशिक कार्यालयातील अधिकारी याबाबत अनभिज्ञ दिसले. यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या महामार्गाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एवढा रस का दाखवतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशिकरोड येथील बिटको चौकातून भगूरमार्गे पांढुर्ली-शिवडे या मार्गान वाहने शिवडे येथील प्रस्तावित इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावर जाऊ शकतील. तसेच नाशिक रिंगरोडनेही वाहने या मार्गापर्यंत येऊ शकतील व तेथून समृद्धी महामार्गावर पोहोचू शकतील.
समृद्धीमार्गे येणाऱ्या प्रवाशांनाही शिवडे येथून नाशिकला कमी वेळात पोहोचता येईल. नाशिक रोडहून शिवडे हे अंतर २५ किलोमीटर आहे. सिंहस्थात हा इंटरचेंज अधिक लाभदायी ठरेल, ही बाब रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
काही प्रश्न...
- शिवडे येथे समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना खूप विरोध झाला होता. त्यानंतर तेथे उड्डाणपूल उभारून कमीत कमी जमीन अधिग्रहित केली. आता तेथे इंटरचेंज उभारण्यासाठी जमीन मिळेल का?
- नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यालय असताना त्या विभागाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या इंटरचेंजबाबत का माहिती घेत आहेत?