Tata Airbus
Tata Airbus Tendernama
टेंडर न्यूज

शिंदे सरकारची गुजरातला 'दिवाळी' भेट; 22 हजार कोटींचा गेला प्रकल्प

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट हा २२ हजार कोटींचा प्रकल्पही आता गुजरातने पळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वडोदरा येथे या प्रकल्पाचे उद्धाटन रविवारी, 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी 22 हजार कोटींचा हा प्रकल्प नागपूरला होणार असल्याचे सांगितले होते. 22 हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा असल्याचेही त्यांनी सांगितले होते. यावरुन आता महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.

याआधी महाराष्ट्रात येऊ घातलेला सुमारे दीड लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट गुजरातने पळवला आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात २ लाख रोजगार निर्मिती अपेक्षित होती. त्यामुळे शिंदे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर आता 22 हजार कोटींचा हा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट गुजरातला जाणार आहे. सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने गेल्यावर्षी स्पेनच्या मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. कडून 56 सी-295एमडब्लू वाहतूक विमान खरेदी करण्यास मान्यता दिली होती. संरक्षण मंत्रालयाने मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. सोबत संबंधित उपकरणांसह विमान संपादन करण्यासाठी करारावर स्वाक्षरी सुद्धा केली आहे. करारा अंतर्गत, उड्डाणासाठी सज्ज 16 विमाने वितरित केली जातील आणि 40 विमाने भारतीय विमान कंत्राटदार, टाटा समूह, टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (टीएएसएल) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस),  टीएएसएलच्या नेतृत्वाखाली भारतात तयार करेल. लष्करी विमानाची निर्मिती खासगी कंपनीद्वारे केली जाणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च  21,935 कोटी रुपये आहे. या विमानाचा वापर नागरी उद्देशांसाठीही केला जाऊ शकतो.

'मेक इन इंडिया' आणि देशांतर्गत विमान निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील वडोदरा येथे भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाच्या निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पावरून विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होते असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का ? असा प्रश्न सध्या पडत आहे असेही जयंत पाटील म्हणाले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला त्याचवेळी आम्ही सांगितले होते की, एअरक्राप्ट प्रकल्प तरी खेचून आणा. त्यावेळी राज्याचे उद्योग मंत्री म्हणाले होते आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू. पण एवढा मोठा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला. त्यामुळे हे सरकार फक्त स्वत:साठी काम करत असल्याचे  दिसते, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.