Mumbai
Mumbai Tendernama
टेंडर न्यूज

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन; पाहणीसाठी खुद्द रेल्वेमंत्री 'बीकेसी'त

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महाविकास आघाडी सरकार असताना मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai-Ahmedabad Bullet Train) प्रकल्पाचे काम राज्यात रखडले होते. राज्यात सत्ता परिवर्तनानंतर बुलेट ट्रेनचा कामाने गती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी अचानकपणे वांद्रे-कुर्ला संकुलात भेट देऊन बीकेसीत तयार होणाऱ्या भुयारी टर्मिनसची माहिती घेतली.

देशातील पहिल्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम राज्यात रखडले होते. बुलेट ट्रेन मार्गाकरिता वांद्रे कुर्ला संकुलातील स्थानक आणि वांद्रे-कुर्ला संकुल ते ठाणे, कल्याण शिळफाटा २१ किलोमीटरच्या भुयारी मार्गाच्या कामासाठी काढण्यात आलेले टेंडर प्रशासकीय अडचणीमुळे रद्द करण्याची नामुष्की नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनवर आली होती. मात्र, राज्यातील सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलेट ट्रेनला राज्य सरकारच्या आवश्यक सर्व मंजुरी तातडीने देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने (एनएचआरसीएल) वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) भुयारी बुलेट टर्मिनससाठी नुकतेच टेंडर मागवले आहे.

राज्यातील बुलेट ट्रेनचे काम रखडू नये म्हणून आता स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जातीने लक्ष घातले आहे. गुजरातमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाची पाहणी केल्यानंतर, रात्री १० वाजून ३० मिनिटांच्या सुमारास अचानक रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) भेट दिली. यावेळी नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशचे अधिकारी उपस्थित होते. अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेनच्या कामाचा आढावा घेतला. तसेच काम रखडणार नाही यासाठी संबंधित विभागाला सूचनाही दिल्या असल्याची माहिती आहे.

सत्तेत येताच आवश्यक त्या सर्व परवानग्या देणाऱ्या राज्यातील नवीन सरकारचे मी आभार मानतो. मुंबई शहरासाठी बुलेट ट्रेन खूप महत्त्वाची आहे. यामुळे मुंबईचा आर्थिक विकास होईल आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार नाही तर गुजरात आणि मुंबई जवळ येईल.
- अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे मंत्री