Aurangabad
Aurangabad Tendernama
टेंडर न्यूज

पुणे-औरंगाबाद द्रुतगतीचा खर्च दोन महिन्यांतच वाढला २ हजार कोटींनी

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : पुणे-नगर-औरंगाबाद या रस्त्याची घोषणा मार्च २०१६ मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी हा रस्ता सहा पदरी करण्याचे ठरले होते. मात्र, २०१८ मध्ये हा रस्ता आठ पदरी केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केली होती. विशेष म्हणजे २४ एप्रिलला औरंगाबादेत विकास कामांच्या लोकार्पण आणि भुमिपूजन प्रसंगी गडकरी यांनी १० हजार कोटींतून हा द्रुतगती महामार्ग होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता अडीच महिन्यातच चक्क दोन हजार कोटींची वाढ करत, बारा हजार कोटींतून हा महामार्ग होणार असल्याचे ते म्हणत आहेत.

पुणे-नगर-औरंगाबाद रस्त्याला २०१६ मध्येच राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केले होते. २०१८ हा रस्ता आठ पदरी करण्यात येणार असल्याचे म्हणत त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याची सूचना देखील नितीन गडकरी यांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना चार वर्षापूर्वीच दिली होती.

मोदींच्या भारतमाला प्रकल्पात समावेश

२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारतमाला' प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानुसार पहिल्याच टप्प्यात या प्रकल्पाअंतर्गत केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्रालयाने पुणे-नगर महाराष्ट्रातील ,पुणे-नगर हा ११६ किलोमीटरचा रस्ता व दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद-नेवासा-नगर हा ११० किमी रस्त्याचा समावेश केला होता.

असे दाखवले होते कारण

पुणे-नगर रोडवर रांजणगाव, सुपा व नगर येथे औद्योगिक वसाहती आहेत. औरंगाबाद परिसरात पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक वसाहत आहे. पैठण शहर पैठणी साड्या व पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तिन्ही शहरांना वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने हा नवीन आठ पदरी रस्ता उपयुक्त ठरू शकतो. तसेच, त्यामुळे उद्योगांची संख्यादेखील वाढू शकते. दरम्यान, या रस्त्याच्या कामामध्ये भू-संपादनापासून राजकीय विरोधापर्यंत अनेक अडथळे आल्याने या रस्त्याचे काम रखडले होते; परंतु आता संपूर्ण भू-संपादन झाले असल्याचे देखील गडकरी म्हणाले होते.

असा दाखवला होता रस्ता

या रस्त्याच्या कामामध्ये पादचारी, वाहनांसाठीचे भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल अशी एकूण ६२ 'स्ट्रक्चर'चा समावेश आहे. त्यापैकी पुणे-नगर मार्गावर ५७ 'स्ट्रक्चर'चे काम पूर्ण झाले. मात्र पुढे नगर-औरंगाबादचे काम गुलदस्त्यातच राहिले.

'डीपीआर'ची घोषणा सहा वर्षांपूर्वीची

पुणे-नगर-औरंगाबाद रस्त्याचा 'डीपीआर' तयार करण्याबाबतचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) मार्च २०१६ मध्ये दिले होते. 'डीपीआर' करताना 'औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन' विभागाचा सल्ला घेण्याची सूचना त्यावेळी करण्यात आली होती. मात्र, तेव्हापासून आजतागायत 'डीपीआर' करण्याच्या आदेशावर कार्यवाही करण्यात आली नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शिळ्या विषयाला फोडणी देण्याचा प्रयत्न

त्यानंतर २४ एप्रिल रोजी गडकरी यांनी औरंगाबाद ते पुणे द्रुतगती मार्गाची घोषणा करीत या कामासाठी दहा हजार कोटींचा खर्च लागणार असून, रस्ता तयार झाल्यावर अवघ्या सव्वा दोन तासात औरंगाबाद ते पुणे प्रवास शक्य होईल, सांगितले होते.

अडीच महिन्यातच दोन हजार कोटीची वाढ

त्यानंतर १३ जुलै रोजी गडकरी यांनी औरंगाबाद ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडियाने करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हणत १२ हजार कोटीचा हा महामार्ग सहा पदरी करणार असल्याचे जाहिर केले. तो लेनचा ॲक्सिस कंट्रोल रोड असेल या महामार्गाने अडीच तासांत पुण्याला जाणे शक्य होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. पुणे ते औरंगाबाद या महामार्गाची अलायमेंट ठरली असून २६८ किमी लांबी आहे. सध्याच्या रस्त्यापेक्षा २० किमी जास्त लांबीचा हा रस्ता असेल. पुणे-मुंबई रिंगरोडवर सुरसे नावाच्या टोलनाका आहे. तेथुन रिंगरोडवरून एका पाॅईंटवरून बंगरूळलाही जाता येईल. असे स्वप्न त्यांनी आता दाखवले आहे.