PMP Tendernama
टेंडर न्यूज

पीएमपीला खड्ड्यात घालण्याचा डाव; 7 मीटर बसचा आग्रह नेमका कोणाचा?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : 'पीएमपी'ने नऊ मीटर बसची मागणी केली असता सात मीटरच्या ३०० बस लादण्याचा प्रकार घडत आहे. सात मीटर बस उत्पादनात एकाच कंपनीची मक्तेदारी असल्याने कंपनी काही राजकीय व्यक्तींना हाताशी धरून सात मीटरची बस पीएमपीच्या माथी मारण्याचा घाट रचला जात आहे.

कमी प्रवासी क्षमता असलेल्या वाहनातून प्रवास केल्याने उत्पन्न मिळते. तुलनेने खर्च मात्र अधिक येतो. ‘पीएमपी’ची सध्या संचलनातील तूट जवळपास ७१० कोटी इतकी आहे. सात मीटरची बस व कॅबमुळे येणाऱ्या काळात संचलनातील तूट वाढणार हे निश्चित आहे.

मागील काही दिवसांमध्ये ‘पीएमपी’ला मोठ्या प्रमाणात तोटा झाला आहे. यात खासगी बसच्या अतिवापरामुळे होणार तोटा हा सर्वाधिक आहे. हे कमी म्हणून की काय आता सात मीटरच्या आकाराच्या ३०० बस व २०० कॅब भाडे तत्त्वावर घेण्याचा घाट घातला जात आहे. यातून तुलनेने कमी प्रवासी वाहतूक होणार आहे. त्यामुळेच ‘पीएमपी’ने नऊ मीटरच्या आकाराच्या मोठ्या बस घेण्याची मागणी केली होती. मात्र, राजकीय दबावामुळे दोन्ही महापालिकेचे प्रशासन ‘पीएमपी’कडे सात मीटर बसचा आग्रह धरला.

तसेच ‘पीएमपी’ला सात मीटरच्या बसचा जबरदस्तीने प्रस्ताव पाठविण्यास सांगितले असल्याचे ‘पीएमपी’मधील एका अधिकाऱ्याने सांगितले. या संदर्भात ‘पीएमपी’ची बाजू जाणून घेण्यासाठी ‘पीएमपी’चे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

बिझनेस मॉडेल काय सांगते?
‘पीएमपी’च्या बिझनेस मॉडेलचा विचार केला तर पीएमपी व मक्तेदारांच्या खासगी गाड्याची संख्या समान असली पाहिजे. राजकीय स्वार्थामुळे मात्र ‘पीएमपी’मध्ये परिस्थिती उलटी आहे. सध्या ‘पीएमपी’च्या १६५० बस रस्त्यांवर धावत आहे. पैकी ८०० ‘पीएमपी’च्या मालकीच्या आहेत. तर ८५० खासगी आहेत. स्वतःच्या ८०० पैकी २०० बस या येत्या काही दिवसांत भंगारात काढण्यात येणार आहे. त्यामुळे ते ६०० राहतील. तर दुसरीकडे ७ मीटरच्या ३०० बस, २०० कॅब यामुळे खासगी गाड्यांच्या संख्येत ५०० ने वाढ होऊन ती संख्या १३५० इतकी होईल. त्यामुळे बिझनेसच्या मॉडेलचा तोल ढळणार.

किती आहे प्रवासी क्षमता?
- सात मीटर बस : २४ बसून, उभे राहून : ६ = एकूण ३० प्रवासी
- नऊ मीटर बस : ३२ बसून, उभे राहून १४ = एकूण ४६ प्रवासी
- कॅब : ४ प्रवासी
- दोन मीटरची मोठी बस घेतल्यास किमान १६ ते २० प्रवाशांची सोय होऊ शकते
- प्रवासी संख्या वाढली की उत्पन्नात देखील साहजिकच वाढ होऊन संचलन तूट कमी होण्यास मदत