Mumbai-Goa
Mumbai-Goa Tendernama
टेंडर न्यूज

'मुंबई-गोवा हायवे वेळेत न झाल्यास नेत्यांना राजीनाम्यास भाग पाडू'

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा (Mumbai-Goa) महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी आता कोकणातील नागरिक 'मुंबई-गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समिती'च्या छताखाली मुंबईत एकत्र आले आहेत. महामार्गाचे संपूर्ण काम २०२३ मध्ये पूर्ण झाले नाही तर स्थानिक लोकप्रतिनिधींना जबाबदार धरुन त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडण्यासाठी हे जनआंदोलन तीव्र केले जाणार आहे.

सुमारे बारा वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू झाले. एक तप उलटले, तरी काम अपूर्ण अवस्थेत आहे. वर्षानुवर्षे महामार्गाचे काम रखडल्याने कोकणातील नागरिक आक्रमक झाले असून, नुकतीच २० नोव्हेंबर रोजी दादर येथे जनआक्रोश सभा घेण्यात आली. या सभेला २५ सामाजिक प्रतिष्ठान, संस्था, संघटना यांनी पाठिंबा दिला आहे. या २५ संघटनांचे सुमारे एक लाखाच्यावर सभासद असून याचा फायदा जनआक्रोश आंदोलनाला होईल. १८० कोकणवासीय या सभेला उपस्थित होते. येणाऱ्या काळात मुंबईत आंदोलन छेडणार असून, विविध मागण्या करण्यात येणार आहेत. अधिवेशनामध्ये महामार्गाचा प्रश्न मार्गस्थ लावणे, अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना सरकारकडून मदत जाहीर करणे व यापुढे खराब महामार्गामुळे एखादा अपघात झाला तर प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करणे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यासंदर्भात सरकारकडून दिरंगाई होत असेल किंवा १ मे २०२३ पर्यंत काम पूर्ण होईल, अशा पद्धतीचे स्वरूप दिसत नसेल तर आझाद मैदान ते मंत्रालय जनआक्रोश आंदोलन उभारून मंत्रालयाला घेराव घालण्याची रणनीती आखण्यात आली आहे. महामार्गाचे संपूर्ण काम २०२३ मध्ये पूर्ण झाले नाही तर लोकप्रतिनिधींनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशा आशयाचे पत्र देणे, यापुढे कोकणातील कोणतेही लोकप्रतिनिधी ट्रेन, विमानाने कोकणात जाण्यासाठी वापर करीत असतील तर त्यांना अडवून महामार्गानेच प्रवास करण्यास भाग पाडणे, पनवेल ते झारप रस्ता वापरण्यायोग्य व १०० टक्के काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल आकारू नये. नव्या रस्त्यात दहा वर्षांत एकही खड्डा पडणार नाही, अशी लेखी हमी घेणे आदी मागण्या कोकणातील नागरिक करीत आहेत.

दृष्टीक्षेपात मुंबई-गोवा महामार्ग -
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन टप्प्यांत सुरू झाले. पहिला टप्पा पळस्पे ते इंदापूर आणि दुसरा टप्पा इंदापूर ते कोकणच्या तळातील धारपपर्यंत. पहिल्या टप्प्याचे काम सुरू होऊन दहा वर्षे पूर्ण झाली तरी काम अर्धवटच आहे. दुसरा टप्पा इंदापूर ते कोकणच्या तळातील धारप या गावहद्दीपर्यंत असून, त्याचे काम २०१७ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र आजच्या घडीला पाच वर्षे झाली तरी काम पूर्ण झाले नसून, फक्त ७० टक्के काम झाले आहे. ते १० टप्प्यांत असून, नऊ ठेकेदार कंपन्यांनी घेतले आहे. उर्वरित ३० टक्के काम कधी पूर्ण होईल, हा प्रश्न कायम आहे.

पहिला टप्पा इंदापूर ते वडपाले, दुसरा टप्पा वडपाले ते पोलादपूर भोगाव या टप्प्यामध्ये दासगाव ते वीर या ५ किलोमीटरच्या अंतराच्या मार्गासाठी वन खात्याच्या परवानगीसाठी प्रयत्न सुरू असले तरी अद्याप मंजुरी मिळालेली नाही. तिसरा टप्पा भोगाव ते कशेडी टनेल, चौथा टप्पा कशेडी ते परशुराम घाट, पाचवा टप्पा परशुराम घाट ते आरवली, सहावा टप्पा आरवली ते कानते, सातवा टप्पा कानते ते वाकड, आठवा टप्पा वाकड ते तळेगाव, नववा टप्पा तळेगाव ते कालमथ, दहावा टप्पा कालमथ ते धारप असा आहे. या टप्प्याचे जवळपास ३० टक्के काम शिल्लक आहे.

चौपदरीकरणाचा दुसरा टप्पा ३५५.२८० कि.मी.चा आहे. यावर ६१०० कोटी खर्च अपेक्षित असून, त्यापैकी २४०.८८ किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. ११४.३९९ किलोमीटर काम प्रलंबित आहे. आतापर्यंत ७३ टक्के काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यात काही ठिकाणी वन खात्याची परवानगी मिळालेली नाही.

या महामार्गासाठी ११ वर्षांपूर्वी १२०० कोटी खर्च होता; मात्र जसजसा कालावधी वाढत आहे, तसतशी त्याची रक्कम वाढत असून, सध्या ती दोन हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे. वाढीव खर्च टोलच्या माध्यमातून कोकणवासीयांच्या खिशातूनच वसूल केला जाणार आहे. गेल्या दहा वर्षांत या मार्गावर सुमारे २५०० नागरिकांचे प्राण गेले आहेत.