मुंबई (Mumbai) : राज्यातील रोपवेची कामे कार्यान्वित करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) होते.
बैठकीत राज्य शासनामार्फत १६ व राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (एनएचएलएमएल - NHLML) मार्फत २९ अशी एकूण ४५ रोपवे ची कामे हाती घेण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली.
ही रोपवेची कामे करण्याकरिता एनएचएलएमएल या यंत्रणेला आवश्यक जागा ३० वर्षाच्या भाडेपट्टीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.
या योजने अंतर्गत काही प्रकल्पांस राज्य शासनाने एनएचएलएमएलला समभाग हिस्सा उपलब्ध करून दिल्यास या प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नात राज्य शासनाचाही हिस्सा राहील, अशा या महसुली प्रारूपासही मान्यता देण्यात आली.
यातील प्रकल्पनिहाय स्वतंत्र करार केला जाणार आहे. त्यापूर्वी या प्रत्येक प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीपुढे सादर करण्यात येणार आहे.