Mumbai Pune Expressway
Mumbai Pune Expressway Tendernama
टेंडर न्यूज

ऐन दिवाळीत मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे 'जॅम'; बोरघाटात...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वे वरून प्रवास करणाऱ्यांना शनिवारी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे दिवाळीनिमित्त मुंबई बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने बोरघाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मोठ्या संख्येने रस्त्यावर आलेली वाहने आणि बोरघाटात सध्या सुरू असलेली रुंदीकरणांची कामे, मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम आदींमुळे वाहतुकीला अडथळे येत होते. दुसरीकडे अवजड वाहने रस्त्यातच बंद पडल्यानेही वाहतूक कोंडीत भर पडली. त्यामुळे शुक्रवारनंतर शनिवारीही सलग दुसऱ्या दिवशी द्रुतगतीवर वाहनचालकांचे हाल झाले.

खोपोली हद्दीत खोपोली एक्झिट, बोरघाटात आडोशीजवळ मिसिंग लिंक प्रकल्पासह रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र आहे. बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ शुक्रवारी सकाळी एक अवजड वाहन बंद पडल्याने खंडाळा एक्झिटपर्यंत मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. कुणे नामा, दस्तुरी, अंडा पॉईंट येथेही वाहतुकीची कोंडी झाली. ऐन सणासुदीला पुणे, लोणावळा, महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूर, सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना ट्रॅफिक जॅमचा चांगलाच तडाखा बसला.

दिवाळीसाठी आपापल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक, पर्यटक यांची महामार्गावर वाढली आहे. तशातच बोरघाटात सुरू असलेले रस्ता रुंदीकरण व मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम आणि मार्गात अवजड वाहने बंद पडत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे शनिवारी पहाटेपासूनच द्रुतगतीवर वाहतुकीची कोंडी अनुभवण्यास मिळाली.