<div class="paragraphs"><p>Mumbai</p></div>

Mumbai

 

Tendernama

टेंडर न्यूज

अबब! मुंबईत नाल्यांच्या सफाईवर 'इतके' कोटी खर्च

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : दरवर्षी मुंबईत कोट्यावधींची नालेसफाई होते, त्यानंतरही मुंबईतील अनेक भागात दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबते. काही वर्षांपूर्वी मुंबईत नाले सफाईचा मोठा घोटाळा उघडकीस आला होता. त्यामुळे दरवर्षीच नाले सफाईच्या कामावर प्रश्‍न निर्माण केले जातात. नेमेचि होते नालेसफाई पण तरीही तुंबते मुंबई अशीच काहीशी गत झाली आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीची आचारसंहिता त्याचबरोबर कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे लागू होणारे लॉकडाऊन अशा कात्रित नालेसफाई अडकू नये म्हणून मुंबई महापालिकेने यंदा नाले सफाईची तयारी सुरु केली आहे. लहान नाले, पर्जन्यपेटीका, बॉक्स ड्रेन यासाठी 151 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. तर, मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी 83 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका नाल्याची सफाई आतापर्यंत पावसाळ्यापूर्वी म्हणजे मार्च महिन्यानंतर सुरु करत होती. मात्र, कोविडची तिसरी लाट उसळू लागली आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. असे झाल्यास नाले सफाईच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहमी पेक्षा अगोदर कामे सुरु करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. तसेच, महापालिकेची निवडणूकही होण्याची शक्यता आहे. या आचारसंहितेत प्रस्तावांची मंजूरी रखडू नये म्हणून महापालिकेने नाले दुरुस्तीच्या टेंडर प्रक्रियेला सुरुवात केली आहे. माेठ्या नाल्याच्या सफाईची टेंडरची मुदत नुकतीच संपली आहे. तर, लहान नाल्याच्या सफाईची टेंडर 18 जानेवारीपर्यंत भरायची आहेत.

मुंबईत 215 किलोमीटरचे मुख्य नाले आहेत. तर, 156 किलोमीटर लांबीचे लहान नाले आहेत. तसेच, 1 हजार 986 किलोमीटर लांबीच्या पर्जन्यपेटिका आहेत. मागील वर्षी कोविडच्या लॉकडाऊन मध्येही मुंबईतील 104 टक्के नाले सफाई झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. त्यावेळी तब्बल 3 लाख 24 हजार 282 मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही मुंबईतील अनेक भागात दरवर्षी प्रमाणे पाणी तुंबले होते. काही वर्षांपूर्वी मुंबईत नाले सफाईचा घोटाळा उघड झाला होता. त्यामुळे दरवर्षीच नाले सफाईच्या कामावर प्रश्‍न निर्माण केले जातात.

असा होणार खर्च
मोठे नाले -11 कोटी 76 लाख
लहान नाले - 8 कोटी 34 लाख
------
पुर्व उपनगर
-मोठे नाले - 26 कोटी 75 लाख
-लहान नाले - 32 कोटी 48
----
पश्‍चिम उपनगर
-मोठे नाले - 45 कोटी 31 लाख
-लहान नाले - 61 कोटी 44 लाख