BMC
BMC Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai : साडेतीन लाख विद्यार्थ्यांना 20 कोटींचे शालेय साहित्य मोफत

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिका शाळांमधील सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे मोफत वाटप केले जाते. या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेने काढलेल्या टेंडरमध्ये मर्चंडायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ठेका देण्यात आला असून या वस्तूंच्या खरेदीसाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

गेल्या वर्षी प्रस्ताव उशिरा मंजूर झाल्याने विद्यार्थ्यांना दप्तर, पाण्याची बॉटल, खाऊचा डबा देण्याऐवजी रोख पैसे देण्यात आले होते. यंदा मात्र रोख रक्कम न देता दप्तर, वॉटर बॉटल व खाऊचा डबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मुलांना २९० ते ४४४ रुपयांपर्यंतचे दप्तर; तर १९३ ते २९६ रुपयांपर्यंत खाऊचा डबा आणि पाण्याची बाटली दिली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय २००७ मध्ये घेण्यात आल्यानंतर मुलांना या वस्तूंचे वाटप केले जात आहे, परंतु मागील वर्षी टेंडर प्रक्रियेला विलंब झाल्याने या शालेय वस्तूंच्या खरेदीचा प्रस्ताव १७ जून २०२२ पासून मंजूर करण्यात आला. त्यामुळे मुलांना शालेय साहित्य मिळण्यास विलंब झाला होता. मुलांना छत्रीसह दप्तर, पाण्याची बॉटल व खाऊचा डबा आदी वस्तू न देता त्यासाठीचे पैसे मुख्याध्यापकांमार्फत वाटप करून या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या; मात्र २०२२-२३ व २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्याचे कंत्राट दोन वर्षांसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना रोख रक्कम न देता दप्तर, वॉटर बॉटल व खाऊचा डबा देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले. या वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मर्चंडायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी टेंडर प्रक्रियेत पात्र ठरली असून या वस्तूंच्या खरेदीसाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

शालेय वस्तूंसाठी होणारा खर्च
- पूर्व प्राथमिक ते दुसरी इयत्ता (एकूण मुले १,१२,९२८) : खर्च प्रत्येकी ४८३.०२ रुपये
- इयत्ता तिसरी ते सातवी (एकूण मुले १,७३,७५५) : खर्च प्रत्येकी ६१५ रुपये
- इयत्ता आठवी ते दहावी (एकूण मुले ७४,२५३) : खर्च प्रत्येकी ७४० रुपये