मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएकडून युद्ध पातळीवर सुरु असलेल्या डी.एन.नगर ते मंडाले 'मेट्रो 2-ब' मार्गिकेचा चेंबूर डायमंड मार्केट ते मंडाले हा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. त्यासाठी मानखुर्द येथील उपनगरीय रेल्वे मार्गावर नुकतेच गर्डर उभारण्याचे काम एमएमआरडीएकडून पूर्ण करण्यात आले आहे.
'मेट्रो 2-ब' चे काम 60 टक्के पूर्ण झाले असून जून 2025 पर्यंत हे काम पूर्णत्वास जाईल असा अंदाज आहे. या मेट्रो प्रकल्पाचा खर्च 10,986 कोटी इतका आहे.
मानखुर्द येथील रेल्वे मार्गिकेवरुन 'मेट्रो 2-ब' मार्गिका जाणार आहे. मंडाले डेपो आणि चेंबूरदरम्यान ही मार्गिका आहे. शहराच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यात येणार आहे. संपूर्ण मेट्रो मार्गिकेचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. 'मेट्रो 2-ए' आणि 'मेट्रो 2-ब' हा मार्ग दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम, डीएन नगर आणि अंधेरी पश्चिम डीएन नगर ते मंडाले डेपो असा आहे.
डीएन नगर येथील ईएसआयसी वसाहत ते मंडाले 'मेट्रो 2-ब' मार्गिका ही 'मेट्रो 2-ए' मार्गिकेचा विस्तार आहे. 'मेट्रो 2-ब' प्रकल्पामुळे पूर्व उपनगरातून थेट दहिसरपर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम उपनगरात येणे सहज शक्य होणार आहे. मात्र हा मार्ग सुरू होण्यासाठी जून 2025 पर्यंत वाट पहावी लागणार आहे. 'मेट्रो 2-ब' चे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे.
'मेट्रो मार्ग 2-ब' ची लांबी 24 किलोमीटर असून या मार्गावर 20 स्थानके असणार आहेत. ईएसआयसी नगर, प्रेम नगर, इंदिरा नगर, नानावटी हॉस्पिटल, खिरा नगर, सारस्वत नगर, नॅशनल कॉलेज, वांद्रे मेट्रो, आयकर कार्यालय, आयएलएफएस, एमटीएनएल मेट्रो, एसजी बर्वे मार्ग, कुर्ला (पू), ईईएच चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द, मंडाले मेट्रो अशी स्थानके या मार्गावर असणार आहेत. 'मेट्रो 2-ब'चा डेपो मंडाला येथे असणार आहे.