Mumbai Metro 5  Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai Metro कडून मुंबईकरांना Good News! 34 किमीच्या नव्या मार्गामुळे...

१८ हजार कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोन अशा एकूण १८,१३०.५५ कोटी रुपयांच्या कामांना CM Devendra Fadnavis यांनी मंजुरी दिली.

मंत्रालयात मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोन अशा एकूण १८,१३०.५५ कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली. या मार्गिकेची लांबी ३४.२१ किमी आहे, ज्यामध्ये १९ स्थानकांचा समावेश आहे.

टप्पा १ कापूरबावडी ते धामणकर नाका, टप्पा २ धामणकर नाका ते दुर्गाडी, मार्गिका ५अ दुर्गाडी - कल्याण – उल्हासनगर या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या भागातील सुमारे ६९ लाख लोकांना फायदा होणार असून प्रवास वेळेत ४०-५०% बचत होईल. या प्रकल्पासाठीच्या आवश्यक परवानगीसाठी केंद्र शासन व संबधित विभागाकडे गतीने कार्यवाही करावी.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकासचे डॉ.एच गोविंदराज, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, कुंभमेळा विकास प्राधिकरणचे आयुक्त शेखर सिंह यावेळी उपस्थित होते.