Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa Highway Tendernama
टेंडर न्यूज

मुंबई-गोवा मार्गावरील खड्ड्यांवरुन हायकोर्टाची तीव्र नाराजी;अखेर..

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा (Mumbai-Goa Highway) राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आदेश देऊनही पूर्णपणे बुजविण्यात न आल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश अभय अहुजा यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. आता हे खड्डे बुजविण्यासाठी न्यायालयाने 23 डिसेंबर २०२२ ही शेवटची मुदत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिली आहे. या आदेशानंतर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून पनवेल-खारघर दरम्यान खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील पनवेल ते झाराप पत्रादेवी अशा 450 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम 2011 पासून सुरू असून अद्याप पूर्णत्वास आलेले नाही. यासंदर्भात चिपळूण येथील विधीज्ञ ॲड. ओवेस पेचकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुप्रीम रोडवेज प्रायव्हेट लि. या कंपनीकडून पनवेल ते इंदापूर हे काम काढून घेतले. मात्र, या संदर्भातील वाद दिल्ली उच्च न्यायालयामध्ये गेल्याने या टप्प्याचे काम रखडले. परिणामी, अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढू लागले.

या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही दिला होता. पण, तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 7 नोव्हेंबर 2022 रोजी प्रतिज्ञापत्र सादर करत खड्डे बुजविल्याचा दावा केला. यामुळे जनहितार्थ याचिकाकर्ते ॲड. ओवेस पेचकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा खोटेपणा उघड केला. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांबाबत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाला येत्या 23 डिसेंबरपर्यंत खड्डे बुजविण्यासाठी मुदत दिली आहे. या जनहित याचिकेच्या सुनावणीत 4 जानेवारी 2023 पर्यंत खड्डे बुजविण्याबाबतच्या कामातील प्रगतीचा अहवालही सरकारने खंडपीठाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत.