Bullet Train
Bullet Train Tendernama
टेंडर न्यूज

बुलेट ट्रेन : बीकेसी स्टेशनच्या १८०० कोटींच्या टेंडरला मुदतवाढ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या विक्रोळी येथील जमिनीवरून कोर्टबाजी सुरू असतानाच बीकेसी येथील भूमिगत स्थानकाच्या बांधकामाकरिता काढलेल्या टेंडरला मुदतवाढ देण्याचा निर्णय नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतला आहे. सुमारे १,८०० कोटींचे हे टेंडर आहे.

पॅकेज सी -1 अंतर्गत या भुयारी स्थानकाचे बांधकाम करण्यासाठीचे टेंडर सादर करण्याची अंतिम तारीख आता 3 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तर तांत्रिक टेंडर 4 नोव्हेंबरला उघडण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनच्या बीकेसीतील भूमिगत स्थानकाकरिता 467 मीटर लांबीच्या कट आणि कव्हर पद्धतीच्या स्थानकाचे बांधकाम करण्यासाठी तसेच 66 मीटरच्या टनेल वेंटिलेशन शाफ्टसाठी आरेखन व निर्मितीसाठी आधी 22 जुलै रोजी टेंडर मागविण्यात आले होते. हे टेंडर उघडण्याची अंतिम तारीख याआधी 20 ऑक्टोबर ठेवली होती. आता ती 3 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. पॅकेज सी-1 अंतर्गत बीकेसी, विक्रोळी आणि सावली येथे अनुक्रमे 36, 56 आणि 39 मीटर खोल जमिनीत टीबीएम मशिनसाठी शाफ्ट टाकण्यात येणार आहेत.

बुलेट ट्रेनचे वांद्रे – कुर्ला संकुल येथे भूमिगत स्थानक होणार आहे. त्याच्या उभारणीसाठी एक हजार ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे स्थानक ४.९ हेक्टर जागेत उभारले जाणार असून १६ डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी सहा फलाट उभारण्यात येणार आहेत. प्रवासी सुविधांसह आकर्षक असे भूमिगत स्थानक असणार आहे. त्यासाठीही टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. बुलेट ट्रेनसाठी बीकेसी ते शिळफाटा 21 किमीचा बोगदा खणण्यात येणार असून 7 किमीचा हा बोगदा ठाण्याच्या खाडीखालून जाणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना वेग दिला आहे. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात भूसंपादनाची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू होती. राज्यात सत्तातरानंतर भूसंपादनालाही गती मिळाली आहे.