Narendra Modi, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Narendra Modi, Devendra Fadnavis, Eknath Shinde Tendernama
टेंडर न्यूज

शिंदे-फडणवीसांमुळे मोदींची बुलेट ट्रेन सुसाट; 135 किमीसाठी टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्यातील सत्तांतरानंतर केंद्र आणि राज्य सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना वेग दिला आहे. आता नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी शिळफाटा ते झारोळी (महाराष्ट्र-गुजरात सीमा) या १३५ किलोमीटरच्या मार्गासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. टेंडरमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ मार्च २०२३ असून १५ मार्च २०२३ रोजी टेंडर खुले केले जाणार आहे. बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा ड्रीम प्राेजेक्ट आहे.

महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचा मार्ग १५६ किलोमीटर इतका आहे. पहिल्या टप्प्यात वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाटा या २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचे टेंडर यापूर्वीच निघाले आहे. हे टेंडर २० जानेवारी २०२३ ला खुले केले जाणार आहे. बुलेट ट्रेनसाठी वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाटा 21 किमीचा बोगदा खणण्यात येणार असून 7 किमीचा हा बोगदा ठाण्याच्या खाडीखालून जाणार आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यात ठाणे शिळफाटा ते झारोळी या १३५ किलोमीटर मार्गाच्या कामांसाठी टेंडर काढण्यात आले आहे. या टेंडरमध्ये ठाणे, विरार, बोईसर या तीन रेल्वे स्थानकांच्या कामांचा समावेश आहे. तसेच या मार्गावर काही पट्ट्यात बोगदे, दुहेरी मार्गिका, अन्य तांत्रिक कामे, स्थानक इमारती, बुलेट ट्रेनसाठी आगार आदी कामे होणार आहेत. १३५ किलोमीटरच्या मार्गात ११ नद्यांवरील पूल आहेत तर सहा बोगदे आहेत. आता राज्यातील संपूर्ण १५६ मार्गाच्या कामांसाठीची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात सुरुवातीचे स्थानक असलेल्या वांद्रे कुर्ला संकुल स्थानकाच्या बांधकाम टेंडरसाठी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड, अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि एमईआयएल-एचसीसी (संयुक्त) या कंपन्या इच्छूक आहेत.

बुलेट ट्रेनचे वांद्रे – कुर्ला संकुल येथे भूमिगत स्थानक होणार आहे. त्याच्या उभारणीसाठी एक हजार ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे स्थानक ४.९ हेक्टर जागेत उभारले जाणार असून १६ डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी सहा फलाट उभारण्यात येणार आहेत. प्रवासी सुविधांसह आकर्षक असे भूमिगत स्थानक असणार आहे.