Nitin Gadkari
Nitin Gadkari Tendernama
टेंडर न्यूज

नितीन गडकरींचा अधिकारी, ठेकेदारांना सज्जड दम; म्हणाले यापुढे...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : शहरातील प्रत्येक वस्तीत पाणी साचले असून शहरच तुंबल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वीची अपेक्षित कामे वेळेवर पूर्ण केली जात नसल्याने केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) महापालिका, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदारांवर चांगलेच बरसले.

नवीन कामे थांबवा, आधी अर्धवट कामे पूर्ण करा, चिखल होणाऱ्या भागातील दुरुस्ती त्वरित करा, असे निर्देश त्यांनी महापालिका, नासुप्रला दिले. सोबतच नव्या ड्रेनेज लाईनच्या जाळ्याचा प्रस्ताव तयार करण्याचीही सूचना त्यांनी केली. बैठकीत पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन, एनडीआरएफचे रमेशकुमार, माजीमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक दाभोळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सरदेशमुख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

रस्ते बांधकाम करणाऱ्या मनपासह, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आपापल्या रस्त्यांची देखभाल करून तुंबलेले पाणी हटविण्याची जबाबदारी मनपासह, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पार पाडायला हवी होती. परंतु गेल्या नऊ दिवसांपासून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने गडकरी यांनी सर्वच संस्थांचे कान टोचले. लोखंडीपूल, घाटरोड, अजनी पूल या रस्त्यांवर पाणीच पाणी असल्यामुळे वाहतुकीतही खोळंबा झाला होता. नरेंद्रनगर पुलाखाली पाणी असल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक बंद होती. लोकांना अन्य मार्गांनी जावे लागले. या भागाची तपासणी व निरीक्षण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावे व पुढे पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही गडकरींनी दिल्या.